तुझिये भेटिचि बहु आस रे मोरया ॥ लेखितां बहुत झाले दिवस रे मोरया ॥ कां बापा (देवा) धरिलें उदास रे मोरया ॥ वियोगे झालों कासाविस रे मोरया ॥१॥ तुजविण कोण आम्हां आहे बा मोरया ॥ एक वेळ कृपादृष्टि (दयादृष्टि) पाहे रे मोरया ॥ ध्रु० ॥ रात्रंदिवस वाट पाहे रे मोरया ॥ एक निढळावरी ठेवुनी बाहे रे मोरया ॥ वेगी तूं येई लवलाहि रे मोरया ॥ धेनू वत्सालागि जैसी मोहे रे मोरया ॥२॥ जन्मोजन्मींचा तुझा दास रे मोरया ॥ आणिक कोणाची नाहीं आस रे मोरया ॥ एक वेळ उद्धरि या दिनास रे मोरया ॥ त्रास देई सकळा (या) कर्मास रे मोरया ॥३॥ संसारसागरी दुःख भारी रे मोरया ॥ एक वेळ भवसिंधु तारि रे मोरया ॥ आयागमन तूं निवारी रे मोरया ॥ दीननाथा (दीनबंधु) एकवेळ तारि रे मोरया ॥४॥ दीन (भक्त) वत्सल बाप आला रे मोरया ॥ साष्टांगी दंडवत घाला रे मोरया ॥ मोरया गोसावी तन्मय झाला रे मोरया ॥ चरणांबुज देखोनियां निवाला रे मोरया ॥ तुजविण कोण आम्हा आहे बा मोरया ॥ एकवेळ कृपादृष्टी (दयादृष्टी) पाहि रे मोरया ॥५॥
(मोरगांवी भाद्रपद व माघी यत्रेत तृतीयेस मोरयापुढे सुरुवातीला म्हणतात.)