श्रीक्षेत्र चिंचवड

श्रीक्षेत्र चिंचवड परिसर:

श्रीमोरया गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर:

प्रियन्तां खलु गाणपत्यपथगाः श्रीमोरयायोगिनो
यै़र्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा ।
तेऽद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम्‌
रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान्‌ मोरयान्‌ प्रार्थये ॥

अर्थ:

भ्रष्ट झालेले हे जग ज्यांनी आपल्या कीर्तीने धवल केले, ते श्री गाणपत्य मार्गाचे अनुयायी श्रीमोरया गोसावी प्रसन्न होवोत. ते आज पवित्र अशा पवनेच्या काठावर चिरकाल वास करत आहेत. ते सन्मार्गाची कास धरणाऱ्यांचे रक्षण करोत. त्या मोरया गोसावींची मी प्रार्थना करतो.

दक्षिणवाहिनी पवनानदीच्या तीरावर श्रीमोरया गोसावींचे समाधी मंदिर आहे. इथे सदगुरू श्रीमोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली. हे एक जागृत देवस्थान आहे. महाराज वर्ष १५६१, शके १४८३ मार्गशीर्ष वद्य षष्ठीला समाधिस्थ झाले. त्यावेळी त्यांचे वय १८६ वर्षाचे होते. श्रीमोरया गोसावी समाधिस्थ झाल्यावर श्रीचिंतामणी महाराजांनी श्रीमोरया गोसावींच्या डोक्यावर येईल अशी जागा पाहून गुंफेच्या वरच्या बाजूला सिद्धिबुद्धीसहित मंगलमूर्तीची स्थापना केली. हे समाधिस्थान जागृत आहे. या समाधीवर शके १५८० विलंबी नाम संवत्सरात कार्तिक शुद्ध चतुर्थीस देवालय बांधण्यास सुरवात झाली. ते बांधकाम पुढील वर्षी आषाढ शुद्ध चतुर्थीस पूर्ण झाले. इंग्रजी तारखांप्रमाणे बांधकाम आरंभ २७ आक्टोबर १६५८ आणि संपूर्ण १३ जून १६५९. मंदिराची बांधणी साधी दगडाची आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर एक सभामंडप लागतो. या प्रशस्त सभामंडपापासून आत गेल्यावर श्रीमोरया गोसावींची समाधी आहे.

समाधीवरची मूर्ती द्विभुज गणपती सिद्धी बुद्धी सहित श्रीचिंतामणी महाराजांनी बसवलेली आहे. सिंदूर लेपून-लेपून मूर्ती फार मोठी झाली होती. १९५६ साली मूर्तीची खोळ पडली. आत काळ्या पाषाणाची घडवलेली अत्यंत सुबक मूर्ती निघाली. बाहेरच्या गाभाऱ्यात अर्जुनेश्वराची प्रचंड शाळुंका आहे. मोरया गोसावींच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता तेथून आहे, असे म्हणतात.

श्रीमोरया गोसावी यांच्या समाधी समोरच श्रीचिंतामणी महाराजांची समाधी खोल गुंफेत आहे. त्यांच्या शरीरावर संस्कार झाला, त्या जागेवर आजही द्विभुज गणेशाची मूर्ती आहे. १९८२ साली या मूर्तीचे लुकण निघाले म्हणून नवे लुकण केले आणि पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली. चिंतामणी महाराजांच्या देवळातून बघितले तर मोरया गोसावींच्या समाधीवरील गणपतीचे दर्शन व्हावे अशी रचना आहे.

श्रीनारायण महाराजांच्या समाधीवर दोन आडव्या मूर्ती आहेत. सप्तपुरुषांच्या समाध्या, आठवी दत्तक श्रीधरणीधर महाराजांची शिवाय श्रीकाका महाराज, श्रीदिगंबर महाराज व श्रीकमलाकर महाराज यांच्या समाध्या घाटावर आहेत. वरच्या बाजूला श्रीमोरोबा महाराजांचे वृंदावन आहे. वरच्या देऊळ मळ्यात मोरया गोसावींचे गुरु नयनभारती गोसावी आणि श्रीविघ्नेश्वर महाराज (औंधकर) यांच्या समाध्या आहेत. सर्व देवळे घडीव दगडात बांधलेली आहेत.

देवळाच्या पश्चिमेला पवना नदी वाहत आहे. पूर्वेला रस्ता आहे. उत्तरेला बगीचा आहे आणि दक्षिणेला विस्तृत पटांगण आहे. या पटांगणात संजीवन समाधी महोत्सव होतो व महाप्रसाद होतो. महोत्सवामध्ये गायन वादनाचे कार्यक्रम होतात. पुण्यतिथीला हजारो लोकांना महाप्रसाद येथेच मिळत असतो.

सप्त सत्पुरुष

मोरगावच्या श्रीमयूरेश्‍वराने श्रीमोरया गोसावींना "तुझ्या सात पिढ्यांमधे माझा अंश राहील" असा आशीर्वाद दिला होता. या सात पिढ्यातील प्रत्येक सत्‌पुरुषाची एक अशी सात समाधी स्थाने श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात आहेत.

१. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावीइ.स. १३७५ ते १५६१
२.श्री चिंतामणी महाराज (पहिले)इ.स. १५६१ ते १६२५
३.श्रीनारायण महाराज (पहिले)इ.स. १६२५ ते १७१९
४.श्रीचिंतामणी महाराज (दुसरे)इ.स. १७१९ ते १७३६
५.श्रीधरणीधर महाराज (पहिले)इ.स. १७३६ ते १७७२
६.श्रीनारायण महाराज (दुसरे)इ.स. १७७२ ते १८०२
७.श्रीचिंतामणी महाराज (तिसरे) इ.स. १८०२ ते १८०५

तिसरे चिंतामणी महाराज निपुत्रिक होते. त्यांनी सिद्धटेक घराण्यातून गोविंद देव यांचा मुलगा सखाराम दत्तक घेतला. त्याचे नाव धरणीधर(दुसरे) ठेवले. इ.स. १८०५ ते १८५२

श्रीमंगलमूर्ती वाडा:

श्रीमोरया गोसावींच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर उजव्या हाताने गावात प्रवेश केल्यावर चिंचवड गावात संस्थानचा श्रीमंगलमूर्ती वाडा आहे. या वाड्यात श्रीमोरया गोसावींना मोरगावला कऱ्हा नदीत मिळालेली मूर्ती सिंहासनावर विराजमान झाली आहे. श्रीमंगलमूर्तीच्या जवळ उत्तराभिमुख कोठारेश्वर नावाची जुनी गणपतीची मूर्ती आहे. शेजारी शमीचे झाड आहे. समोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपाचे लाकूडकाम देखणे आहे. त्यात हंड्या, झुंबरे आहेत. अष्टविनायकांच्या मोठ्‍या तसबिरी आहेत. उत्सवातले सर्व मोठे कार्यक्रम या ठिकाणी होतात.

या वाड्यात श्रीमोरया गोसावी यांच्यानंतर गादीवर बसणारे महाराज रहात असत. वाडा अत्यंत ऐसपैस आहे. हा वाडा इतका जुना आहे की काही भागात छत्रपती श्रीशिवाजी महाराज येऊन गेले होते. काही भाग श्रीचिंतामणी महाराजांनी बांधाला आहे, काही भाग नाना फडणीस आणि हरीपंत फडके यांनी बांधलेला आहे.

या वाड्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला सभामंडपासमोर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे कार्यालय आहे. वाड्यात विद्यार्थ्यांच्या वेदाध्ययनाची, त्यांच्या जेवणाची व राहण्याची संस्थानतर्फे व्यवस्था केली आहे.

श्रीकोठारेश्वर

मंगलमूर्ती वाड्यामध्ये श्रीमंगलमूर्तीच्या जवळ उत्तराभिमुख कोठारेश्वर नावाची जुनी गणपतीची मूर्ती आहे. श्रीमंगलमूर्तीच्या मागे ही मूर्ती असते. श्रीकोठारेश्‍वराची दररोज पूजा होते. श्रीमंगलमूर्तींची स्वारी यात्रेकरिता वाड्या बाहेर निघाल्यावरही या मूर्तींची पूजा करतात.
श्रीकोठारेश्वर हे नाव पडण्याचे कारण असे की श्रीमोरया गोसावी पार्थीव (मातीच्या) गणेशाची पूजा करून ज्या जागेवर विसर्जन करित, त्या जागी ही मूर्ती श्रावण शुद्ध ६ शके १७७२ या दिवशी स्थापन केली.

श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीकोठारेश्वरांचा उत्सव सुरू होतो. श्रीमंगलमूर्तींची स्वारी परत येईपर्यंत दहा दिवस याच मूर्तीची विशेष पूजा अर्चा नैवेद्य वगैरे करतात. यावेळीही येथे अन्नछत्र वगैरे चालू असते.