श्रीक्षेत्र थेऊर

श्रीचिंतामणी मंदिर व परिसरातील स्थळे:

श्रीक्षेत्र थेऊरचे श्रीचिंतामणी मंदिर उत्‍तराभिमुख असून भव्य व सुंदर आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सभामंडप बांधला व देवालयाचा विस्तार केला. श्रीचिंतामणींची मूर्ती भव्य, पूर्वाभिमुख व डाव्या सोंडेची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे.

चिंतामणी मंदिर परिसरात शंकराचे, विष्णू-लक्ष्मीचे व दक्षिणमुखी मारूतीचे मंदिर आहे. ग्राम देवता असलेल्या महातारी आईचे मंदिर उत्तरेकडे एक कि. मी. अंतरावर आहे. त्याच्या जवळ सिद्धेश्‍वराचे (शंकराचे) मंदिर असून जवळच महासाधू श्रीमोरया गोसावी यांनी केलेल्या तपश्चर्येचे स्थान आहे. तसेच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे निर्वाण स्थान चिंतामणी मंदिर परिसरात आहे.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूस श्रीचिंतामणीचे माता पिता 'माधव व सुमेधा' देवी यांची मंदिरे आहेत. त्याच्या जवळच खडकेश्वर हे शंकराचे मंदिर आहे. त्याच परिसरात कालिका मंदिर व भैरवनाथाचे मंदिर आहे. पश्चिमेकडे नदीच्या काठावर रमाबाईसाहेब या आपले पती श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यंच्या सह सती गेल्या, त्यांचे स्मारक आहे. रमाबाई पेशवे स्मारकाचे चिंचवड देवस्थानाने जीर्णोद्धार केलेला आहे. श्रीचिंतामणी मंदिराच्या नैऋत्य दिशेला कौण्डिन्य ऋषिंचा आश्रम असलेले स्थान अंदाजे १ कि. मी. अंतरावर आहे.

थेऊर गावाला तीनही बाजूंनी मुळामुठा नदीचा वेढा आहे. तेथे नदीला बाराही महीने पाणी असते. नदीच्या डोहाला ’कदंबतीर्थ’ किंवा ’चिंतामणितीर्थ’ असे म्हणतात.

दर्शनाच्या वेळा:

सकाळी ५ ते रात्रो १०:०० वाजेपर्यंत. रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत मंदिरात प्रवेश करता येत नाही.

राहण्याची सोय: भक्तनिवासाची वेळ सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत आहे. भक्त निवासाचे आरक्षण (बुकिंग) आगाऊ अथवा फोनवर केले जात नाही.

महाप्रसाद: मंदिर परिसरात भाविकांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे सकाळी १२ ते दुपारी २ पर्यंत महाप्रसादाची सोय आहे. संध्याकाळी अन्नसत्र सुविधा उपलब्ध नाही.

श्रीक्षेत्र थेऊर येथील श्रीचिंतामणी संबंधीत ग्रंथ संपदा:

’श्री चिंतामणी विजय’: श्री धुंडिराज सखाराम पोफळे यांनी या ग्रंथाची रचना केली. चिंतामणी मंदिर व परिसरातील सर्व धार्मिक स्थळांची, मंदिरांची ओवीबद्ध माहिती यात आहे. श्री चिंतामणींच्या अवतार कार्या विषयी समग्र माहिती यात आहे. श्री चिंतामणींचे चरित्र व इतर संबंधित माहिती साठी हा ग्रंथ प्रमाण मानला जातो. गणेश गीता, मुद्‌गल पुराण या सारख्या प्राचीन ग्रंथांचा संदर्भ घेऊन ’श्री चिंतामणी विजय’ या ग्रंथाची रचना झाली आहे. अनेक भाविक या ग्रंथाचे पारायण करतात.