पदांचा गाथा - वारां प्रमाणे धूपार्तिची सरणी

गुरुवार

॥ पद ३१ ॥

अहो नमिला श्रीगुरु मोरया गोसावी ॥ अहो त्यासी अष्टभावें हो प्रणिपात ॥१॥ अहो प्रणिपात करितों तुज बा गुरुराया ॥ अहो नेणें आणिक दुजा हो तुजवाचोनी ॥२॥ अहो तुजवाचोनी नाहीं कर्मांचा छेदक ॥ अहो तोडिसी भवदुःख हो क्षणमात्रे ॥३॥ अहो क्षणमात्रे तारिले पापी हे उत्कट ॥ म्हणुनी नाम प्रकट हो त्रयलोकीं ॥४॥ अहो त्रैलोकीं प्रसिद्ध असे विघ्नराज (महाराज) ॥ भक्त भवार्णवी हो तारियेले ॥५॥ अहो तारियेले जीव संख्या नाहीं त्यासी ॥ अहो माउली भक्ताची हो कृपाळू हे ॥६॥ अहो कृपाळु म्हणविसी मज कां उपेक्षिसी ॥ अहो माझी सर्व लाज गा आहे तुज ॥७॥ अहो तुज देवराया करितों विनवणी ॥ अहो निष्ठुर तूं मनी हो न धरी देवा ॥८॥ अहो देवराया स्वामी (देवा) अवतार धरिला ॥ रहिवास केला हो कऱ्हेतीरी ॥९॥ अहो कऱ्हेतीरी स्नान करिती पापी जन ॥ मग घेती दर्शन हो तुझें वेगीं ॥१०॥ अहो वेगीं येती प्राणी तुज लोटांगणी ॥ अहो धन्य त्यांचे जननी हो येउनिया ॥११॥ अहो येउनिया प्राण्या साध्य तुम्ही साधा ॥ अहो ऐकवेळ वेधा हो मोरेश्वर ॥१२॥ अहो मोरेश्वरपायी वृत्ति लीन करा ॥ अहो चुकतिल येरझारा हो पळमात्रे ॥१३॥ अहो पळपळ तुझे जात असे वृथा ॥ अहो आयुष्य भरवंसा हो नको धरूं ॥१४॥ अहो धरूं नका तुम्ही मायेची संगती ॥ अहो तेणे संगे होतील हो यातायाती ॥१५॥ अहो यातायाती चुकवी स्वहित तूं करी ॥ निर्धारी तूं ध्यायी हो चरण त्याचे ॥१६॥ अहो त्याची प्राप्ति तुम्ही करा हो सकळ ॥ अहो घडेल कैवल्यहो वास तुम्हा ॥१७॥ अहो तुम्हासी पडला का रे अंधकार ॥ अहो संसार दुस्तर हो चुकेल कैसा ॥१८॥ अहो कैसा तुम्हा नाहीं मायेचा कंटाळा ॥ अहो तेणे वेळोवेळा हो दुःख होय ॥१९॥ अहो होईल जाचणी गर्भाची भोगणी ॥ अहो कष्टविली जननी हो येउनिया ॥२०॥ अहो येउनि संसारा मोरया पाहुनि ॥ अहो दास चिंतामणी हो विनवितो ॥२१॥

(दुसऱ्या द्वाराहून परतताना आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुरवातीला हे पद म्हणतात.)

गुरुवार

॥ पद ५८ ॥

चला जाऊं मोरेश्वरा ॥ पाहूं आजी तोची ॥ आम्ही गेलों मोरेश्वराऽ ॥ पाहूं आजी डोळां ॥१॥ रूप पाहुनी नयनी ॥ सुख वाटे जीवा ॥ ऐसें रूप ते पाहिलेंऽ ॥ धरिलें ह्रदयी तेंची ॥ २ ॥ काय सांगूं मी ती गोडी ॥ लागे आजी तुझी ॥ बहु वेधू हा लागलाऽ ॥ दाखवी चरण (पाय) मज ॥३॥ तुजविण देव नेणें ॥ जन्मोजन्मी तूचि ॥ कृपा करुनी दिधलाऽ ॥ आजि देवराया ॥४॥ मोरया गोसावी दातार ॥ आम्हा देतो वर ॥ म्हणूनिया धावें तेथेंऽ ॥ मज आजि तोचि ॥५॥ चिंतामणी दास तुझा तुज मागतसे ॥ चरणी ठाव मज देई ॥ कोठें नव जाय ॥६॥

गुरुवार

॥ पद ५९ ॥

मोरया मोरया मोरया ॥ जप आजि करा ॥ धांवोनिया जाऊ तेथेऽ ॥ पाहू मोरेश्‍वरा ॥१॥ गणेशतीर्थ हे उत्तम ॥ स्नान करू तेथें ॥ मग जाऊ देवळांतऽ ॥ पुजूं देवराया ॥२॥ देव भक्त हे पाहिले ॥ धरिले ह्र्दयीं तेची ॥ भेद तोचि नाही त्यासीऽ ॥ आतां सांगू (बोलू) काय ॥३॥ मोरया गोसावी दातार ॥ जाई मोरेश्वरा ॥ तेणें आनंद हा होयऽ ॥ मोरेश्वरी पाहा ॥४॥ ऐसी आनंदाची गोडी ॥ ह्र्दयी न माये तेची ॥ ठक पडोनियां तेथेंऽ ॥ गोडी लागे त्याची ॥५॥ चिंतामणी दास तुझा ॥ वेधू लागे तया ॥ म्हणुनिया धावे तेथेऽ ॥ पाहे मोरेश्वरा ॥६॥

गुरुवार

॥ पद ४३ ॥

येई तूं धावण्या देवा माझ्या कुढावया ॥ (कोठे) गुंतलासि देवा (मज) हो विसरालासी ॥१॥ देवा पिडिलों मी संसारी ॥ दु:ख मायेच्या लहरी ॥ भोग झाले मज भारी हो येई वेगी ॥ २॥ करुणावचनीं विनवितो ॥ नाम तुझे रे मी मागतो ॥ आणिक नलगे मज काही हो तुज वाचोनी ॥३॥ सर्व आहे रे हे मिथ्या ॥ ठकले जन हे देखतां ॥ भ्रांति पडली त्या मूर्खा हो मायासंगे ॥४॥ माया संगतीची गोडी ॥ नलगे मज सर्व जोडी ॥ बापा तुज मी न सोडी हो कृपावंता ॥५॥ अवघे आहे दु:खमूळ ॥ देहे अहम हें समूळ ॥ चरण तुझे हे निर्मळ हो धरिले वेगी ॥६॥ विषय संगतीच्या फळें ॥ मज अंतर पडले ॥ त्रास उपजला या देही हो विषय नको ॥७॥ रात्रंदिवस घडल्या साठी ॥ अवघ्या गेल्या देवा कष्टी ॥ जन्मा येउनियां सृष्टी हो भार केला ॥८॥ काम क्रोध मद मत्सर ॥ यांची जाचणी बहु फार ॥ यांच्या भये रे विसरलों तुजलागी ॥९॥ जन्मी आहे दुःख प्राप्ती ॥ शीण सांगावा म्यां किती ॥ कष्टविले मंगलमूर्ति हो क्षमा करी ॥१०॥ मागें तुज मी रे एक ॥ भक्ता तारी तूं अनेक ॥ चिंतामणी तुज ध्यातों हो अहर्निशी ॥ ११ ॥

गुरुवार

॥ पद ५७ ॥

टिपऱ्याचा खेळ्या

मोरेश्‍वर गांव बरवा ठाव ॥ तेथे नांदतो मोरया देव ॥ तयाच्या ठायां जा रे एक भावें॥ कृपा करिल मनी दुज न धरावे ॥१॥ चला रे भाईंनो जाऊ त्या ठायां॥ नाचत नाचत पाहू मोरया ॥ध्रु०॥ कऱ्हेच्या पाठारी नांदे इच्छा दानी हो ॥ आणिक दैवत मी न देखे लोचनी हो ॥ तयाच्या ठायां जा रे लोटांगणी हो ॥ झणी वरी पहा तुम्ही आपुले नयनी हो ॥२॥ कामना टाकून तुम्ही भजा एकदंत हो ॥ निष्काम भजा तुम्ही ध्या रे गणपती हो ॥ कामनेची आस नका भजा मोरेश्‍वरी हो ॥ निष्काम भजाल तुम्ही जाल मुक्‍तिद्वारा हो ॥३॥ कामना इच्छाल तरी होईल एक प्राप्ती हो ॥ निष्काम भजाल तुम्हां होईल नाना प्राप्ती हो॥ अंती तुम्हा भय नाही देही उत्तम गती हो ॥ कृपा करील तो भजा सर्वार्थी हो ॥४॥ भाद्रपद मास आला उल्हासलों मनी हो॥ वेगि भेटी द्यावी भक्‍ता त्वरित हो ॥ तुजविण भक्‍त झाले सकळ अनाथ हो ॥ येति तुझ्या ठायां होति सनाथहो ॥५॥ भाद्र्पद मासाचे ठायीं चाललों यात्रेसी हो ॥ ध्वजा पताका आनंदे मिरवती हो ॥ मोरया मोरया नाम गर्जताती हो ॥ धन्य त्यांचे भाग्य देही उत्तम गती हो॥६॥ आलों लवलाही देखिलें कऱ्हा तिर हो ॥ स्नान करूनी तेथे झालो निर्मळ हो ॥ दंडवत चालिलो आम्ही देऊळांत हो ॥ देखिलीं पाऊलें झालो सुस्नात हो ॥७॥ टिपुरि घालितो तुझे महाद्वारी हो ॥ आनंदले भक्‍त कैसे नाचती गजरें हो ॥ लडिवाळ तुझे कैसे खेळती रंगणी हो ॥ आपण गणराज स्वयें खेळ पहाती हो ॥८॥ टिपुरी खेळता माझें झालें समाधान हो ॥ आपण पहाती स्वयें गजानन हो ॥ चिंतामणी दास म्हणे लीन तुझ्या चरणीं हो ॥ चरणापासुनी आणिक ठायां न ठेवी हो ॥ चला रे भाईंनों जाऊं त्या ठांयां ॥ नाचत नाचत पाहूं मोरया ॥९॥

गुरुवार

॥ आरती १ ॥

श्री गणेशाय नम: ॥ श्रीमोरया आदि अवतार तुझा अकळू कऱ्हे पाठारीं ब्रह्मकमंडलु गंगा ॥ रहिवास तये तीरी ॥ स्नान पै केलिया हो ॥ पापताप निवारी मोरया- दर्शन ॥ देवा मोरया- दर्शन ॥ जन्म मरण पै दूरी जयदेवा मोरेश्वरा ॥१॥ जय मंगलमूर्ती आरती चरणकमळा ॥ ओवाळू प्राणज्योति जयदेवा मोरेश्वरा ॥ ध्रु० ॥ अहो सुंदर मस्तकीं हो ॥ मुकुट दिसे साजिरा विशाळ कर्णव्दये ॥ कुंडले मनोहर त्रिपुंड्र टिळक भाळीं ॥ अक्षता तेजस्वर प्रसन्न मुखकमल ॥ देवा प्रसन्न मुखकमल ॥ मस्तकीं दूर्वांकुर जयदेवा मोरेश्‍वरा ॥ जय मं० ॥२॥ अहो नयने निर्मळ हो ॥ अति भोवया सुरेख एकदंत शोभताहे ॥ जडिली रत्‍नें माणिक बरवी सोंड सरळ ॥ दिसती अलौकिक तांबुल शोभे मुखी ॥ देवा तांबुल शोभे मुखी ॥ अधर रंग सुरेख जयदेवा मोरेश्‍वरा जय मं ० ॥३॥ चतुर्भुजमंडित हो शोभती आयुधें करीं ॥ परशु कमळ अंकुश हो मोदक पात्रभरी ॥ अमृत फळ नागर सोंड शोभे तयावरी ॥ मूषक वाहन तुझे ॥ देवा मूषक वाहन तुझे ॥ लाडू भक्षण करी ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥४॥ नवरत्‍न कठीं माळ ॥ यज्ञोपवीत सोज्वळ ताइत मिरवतसे ॥ तेज ढाळ निर्मळ जाई जुई नाग चाफे ॥ पुष्पहार परिमळ चंदन कस्तुरी हो ॥ देवा चंदन कस्तुरी हो ॥ उटी घेऊन परिमळ ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥५॥ अहो प्रसन्न दिसे दोंद ॥ तयावरी नागबंध सर्वांगि सेंदुर हो ॥ वरि मिरवे सुगंध नाभिमंडळ सुरेख ॥ विद्दा करिती आनंद कटिसूत्र शोभताहे ॥ देवा कटिसूत्र शोभताहे ॥ मेखळा कटिबंध ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं ० ॥६॥ सुकुमार जानु जंघा पवित्र चरण- कमळ वर्तुळाकार घोटी ॥ टाचा दिसे सोज्वळ पाउले काय १ वर्णू ॥ अंगुलिका सरळ नखि चंद्र मिरवतसे ॥ देवा नखि चंद्र मिरवतसे ॥ भ्रमर घेती परिमळ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥७॥ अहो चरणी तोडर वाकि ॥ अदुंनाद साजिरा रत्‍नसिंहासनि हो ॥ ओवाळू विघ्नहरा देईल भुक्ति मुक्ति चुकतील येरझारा ॥ गोसावी दास तुझा ॥ मोरया गोसावी दास तुझा ॥ ओवाळू विघ्नहरा जयदेवा मोरेश्वरा ॥ जय मंगलमूर्तीआरती चरण-कमळा ॥ ओवाळूं प्राणज्योति जयदेवा मोरेश्‍वरा ॥८॥
१ कुंकुवर्णे

गुरुवार

॥ आरती ४ ॥

अहो अनुपम्य दिव्य शोभा रविकोटी भ्रूकुटी त्रिपुंड रेखियेला ॥ मृगनाभि लल्लाटी मुखप्रभा काय वर्णू ॥ दिव्य कंदपकोटी कुंडले रत्‍नदीप्ति देवा कुंडले रत्‍नदीप्ति ॥ पदक शोभे कंठीं ॥ जयदेवा धुंडिराजा१ ॥ जय मूष्कध्वजा आरती ओवाळिन ॥ अभय वरद सहजा ॥ जयदेवा धुंडिराजा ॥ ध्रु ॥१॥ अहो सुंदर मुक्तमाळा पुष्पहार रुळती आजानु बाहुदंड ॥ बहिवट शोभती डुलती चारी भुजा ॥ दशांगुले मिरवती आयुधें सहित देखा ॥ देवा आयुधे साहित देखा ॥ बाप मंगलमूर्ति ॥ जयदेवा धु. ॥२॥ अहो स्थूल हे दोंद तुझे वरी उटी पातळ विचित्र नागबंध ॥ शोभे नाभिमंडळ चौदा विद्यांचे भवन ॥ निर्मळ कसिला पीतांबर ॥ देवा कसिला पीतांबर ॥ ॥ वरी रत्‍न झळाळ ॥ जयदेवा. ॥३॥ मेखळा रत्नजडित जानु जंघा नागरा पोटऱ्या गुल्फ दोन्ही ॥ अंदुवाकी साजिऱ्या तोडरू रुळताती ॥ महाधाक असुरा पाउले काय वर्णू ॥ देवा पाउले काय वर्णूं ॥ तेजे लोपल्या तारा ॥ जयदेवा ॥४॥ योगिया ध्यानी गम्य सिंहासनी गणपती उभ्या चारी शक्ती ॥ सामवेद२ स्तविती घालिती विंजणवारे ॥ वरी चवऱ्या ढाळिती गोसावी योगियाच्या मोरया गोसावी योगियाच्या ॥ ध्यानीं मंगल मूर्ती ॥ जयदेवा धुंडिराजा ॥ जय मूषकध्वजा ॥५॥

१ दुंडीराजा २ सामवेश

गुरुवार

॥ पद २७ ॥

तुजविण काय करू देवराया ॥ येई माझ्या विसाव्या ॥ झणी तू उदास न धरी ॥ येई येई लवकरी ॥ तुजविण देह माझा२ हळहळी ॥ झालो बहुत उदास ॥ कैसे म्या कंठावे देवराया ॥ येई माझ्या विसाव्या ॥ येई माझ्या दयाळा ॥ येई माझ्या कृपाळा ॥१॥ अहो जय जय जय गणराज दातारा ॥ ध्रु०॥ अहो यातने गांजलो गर्भवासी ॥ म्हणुनि आलो शरण ॥ नुपेक्षी गणराज दयाळा ॥ आणिक न करी पांगिळा ॥ अभिमान तुज आहे भक्तांचा ॥ ब्रीद बांधिले (बांधुनि) साचा ॥ तुजविण जाऊ कोणा शरण ॥ आणिक दैवत नेणे ॥ अहो जय० ॥२॥ अहो प्रपंच माया ही न सोडी ॥ तेथे लुब्धलो बहुत ॥ पुत्र दारा धनादिक देखोनि ॥ अंती नोहे ती कोणी ॥ जोवरी आहे रे संपत्ती ॥ तोंवरी अवघेचि होती ॥ अंतीं कोणी नाही सोडविता ॥ मग होशिल दुश्‍चित्ता ॥ अहो जय० ॥३॥ अहो सोय नका धरू मायेची ॥ गुंतू नका प्रपंची ॥ इच्याने संगे हें नाडलो ॥ जन देखता भुललो ॥ चरण (पाय) धरा या मोरयाचे ॥ त्रास हरतील कर्माचे ॥ निज पद देउनि स्थापिले ॥ आम्हा चरणी (पायीं) ठेविलें ॥ अहो जय ० ॥४ ॥ अहो म्हणुनिया आवडि बहु जीवा ॥ तुझी लागली देवा ॥ मायेपासुनी तूं सोडवी ॥ व्यर्थ नाडलो देवा ॥ आयुष्य गेलें रे देखतां ॥ मज नाहीं भरंवसा ॥ विनवी चिंतामणी गोसावी ॥ भक्ति आपली दयावी । सेवा आपुली घ्यावी ॥ अहो जय जय जय गणराज दातारा ॥५॥ येई माझ्या विसाव्या ॥ येई माझ्या कृपाळा ॥ येई माझ्या दयाळा ॥ अहो तुजविण गांजिलो गर्भवासी ॥ कोणी नाही सोडविता ॥ अहो जय जय जय गणराज दातारा ॥६ ॥

गुरुवार

॥ पद ६० ॥

तुझे तुला देता काय जावे ॥ प्राण्या नकळें हो काही ॥ लटकाची अहंकार वाढविला ॥ साधी तोचि पापाला ॥ माझें माझें किती म्हणसी ॥ सर्वही टाकून जासी ॥ अहो जय जय जय गणराज उदारा ॥१॥ सकळिक राहिल येथेंची ॥ मग बापुडा होसी ॥ पुत्र तेचि येथे राहती ॥ तैसे तेचि हो पत्नी ॥ यम तुज दंड मारिती ॥ काकुलती हो येसी ॥ अहो जय जय जय गणराज उदारा ॥२॥ अहो करूणा काही त्याला न ये रे ॥ ऐसे जाणून तेही ॥ आपुलें हित तेहि करावे ॥ मोरयासी भजावे ॥ जप तोहि त्याचा करावा ॥ पापें जाळून टाका ॥ अहो जय ग० उ० ॥३॥ अहो शुध्द तेचि बापा हो‍उनी ॥ जाई स्वानंद लोका ॥ ऐसे हित तेचि सांगती ॥ मोरया गोसावी दातार ॥ चला जाऊ पाहु तयाला ॥ तोचि (हाचि) भेटेल आता ॥ अहो जय ग. उ. ॥४॥ अहो चिंचवडी तोचि राहिला ॥ चिंतामणी पाहिला ॥ भेद तोचि नाही तयाला ॥ ऐसे जाणुनी त्याला ॥ मग सोय धरी देवाची ॥ चिंतामणी चरणाचीं (पायाचीं) ॥ अहो जय. ग. उ. ॥५॥ आहो म्हणुनिया आवडी लागली ॥ गणराज (महाराज) चरणी ॥ चिंतामणी तोचि पहावा ॥ ऐसे धरुनी मनी ॥ चिंतामणी दास विनवी ॥ भक्ति आपुली दयावी (सेवा आपुली घ्यावी) ॥ अहो जय ग.उ. ॥ अहो न्यावे त्वांचि माहेरा ॥ अहो जय ० गणराज उदारा ॥६॥

गुरुवार

॥ पद ७० ॥

सिध्दटेकवासी हो सिध्दिविनायक ॥ त्रिगुणनायक हो नमियेला ॥१॥ सिध्दिबुध्दि आई हो अष्टसिध्दि माता ॥ लक्षलाभ भ्राते बंधु माझे ॥२॥ भगिनी सतरावी हो माझी भीमरथी ॥ सद्‍गुरु नांदती हो तये तीरीं ॥ सत्वगुणी चला हो उंच त्या पर्वतीं ॥ सिध्दिनाथा ध्याती हो विष्णु तेथें ॥४॥ महादेव तो रवी हो स्तविती शिवाई ॥अखंडित राही हो प्राण्या तेथे ॥५॥ भगवंत दास हेंचि हो मागत ॥ जन्मोजन्मीं देई हो हेंचि मज ।६॥

गुरुवार

॥ पद ७१ ॥

भीमातटीं स्थळ भूमि सिध्दटेक ॥ तेथे प्रकट झाला सिध्दिविनायक ॥१॥ महाविष्णु प्रति धरिला अवतार ॥ सकळ देवांचा तूं हो ज्येष्ठराज ॥२॥ गणेशमंत्र जप केला हो विष्णूनें ॥ त्याची कार्यसिध्दी हो झाली तेथें ॥३॥ मधुकैटभ दैत्य वधिला तत्क्षणीं ॥ ऐसा प्रताप गणेश नामाचा ॥४॥ महासिद्ध स्थळ नांदे विनायक ॥ करी भक्‍ताची सिध्दी निरंतर ॥५॥ ध्याये मोरया गोसावी ॥ तेणें आम्हा जोडले गणराज ॥‍६॥ त्याचे जगन्नाथ विनवी गजानन ॥ त्यासी देई नाम ध्यास हो एकरूप ॥७॥

गुरुवार

॥ पद ६३ ॥

अहो न विचारी गुणदोष ॥ लावूनि कासेसी ॥ उतरी पैलथडी क्षणमात्रे ॥१॥ अहो भवसागर डोहो ॥ दुस्तर हा जाणा ॥ मोरया गोसावी तारील तेथे ॥२॥ अहो म्हणोनि आवडी ॥ लागलीसे तुझी ॥ मोरया गोसाव्याविण नेणें ॥३॥ अहो चिंतामणी देव ॥ पाहे हो नयनी ॥ तेणें सर्व सिध्दी पावतील ॥४॥ अहो ऐशा त्या हो मूर्ती ॥ ह्रदयी धरुनी ॥ जप तोही त्यांचा करूनिया ॥५॥ अहो चिंतामणी दास ॥ स्मरे नित्य त्याला ॥ आणिक दुसरा देव नेणे ॥६॥

गुरुवार

॥ लळीत ८ ॥

मोरेश्‍वरा तुज़ भेटवया लागुनी ॥ भक्त येती लोटांगणी ॥ फिटली डोळ्याची पारणी ॥ विघ्नहार देखिलीया ॥ १ ॥ माझे मानस गुंतले ॥ चरणी तुझ्या लय पावले ॥ ध्रु. ॥ योगिया मानस मनरंजना ॥ तुज स्मरले गजानना ॥ पावें मूषकवाहना ॥ कृपाळू बा मोरेश्वरा ॥ मा.॥ च.॥ २ ॥ माझे अंतरिचे निज सुख ॥ मज भेटवा गजमुख ॥ क्षेम देउनिया सन्मुख ॥ त्रिविध ताप हरले ॥ मा. ॥ च. ॥ ३ ॥ पैल कऱ्हेतिरी उभा राहे ॥ निजभक्ताची वाट पाहे ॥ वरद उभारूनि बाहे ॥ अभय वरद देत आहे ॥ मा . च. ॥ ४ ॥ मोरया गोसावी योगी बोलती ॥ सत्य साक्ष गणपती ॥ भेटी देउनी पुढती पुढती ॥ शरणांगता नुपेक्षिसी ॥ माझें मानस गुंतले ॥ चरणी तुझ्या लय पावले ॥ ५ ॥
गुरुवार

॥ आरती गुरूवारची ॥

निर्गुण गुणवंता तू विध्नहरा ॥ भक्‍त तारावया कृपासागरा ॥ अभय वरद हस्त तू परशुधरा ॥ भवसिंधुतारक तू करूणाकरा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥ आरती (भवार्ती) ओवाळू तव चरणकमळा ॥ जयदेव ॥१॥ ॥ध्रु०॥ सिंहासन कुसरी मिरवति ठसे । तेज महा कोटि भानु प्रकाशे ॥ तयावरी सुकुमार गणराज (महाराज) बैसे ॥ ब्रह्मादिक स्तविताती मुनिजन संतोषे ॥जयदेव०॥ कनक मंडपावरि कलश शोभती ॥ हिरेजडित रत्‍नक्रीडा फाकती ॥ ध्वजा पताका वरि मिरवती ॥ अकळे नकळसी कवणा हा मंगलमूर्ती ॥ जयदेव०॥ षोडशविधि पूजा झाली गणपाळा ॥ नरसुगण गंधर्व आनंद सकळा ॥ सिध्दि बुध्दि सहित होतसे सोहळा ॥ लिंबलोण करी उमावेल्हाळा ॥जयदेव०॥४॥ अष्टभावे आरती आनंदमूर्ती ॥ निजबोधे ओवाळू कल्याणकीर्ती ॥ मोरया गोसावी करीतो विनंति ॥ शरणागता तारि तू मंगलमूर्ती ॥ जयदेव०॥५॥

(मोठया धुपार्तीचे वेळीं वरील आरती म्हणावयाची असते)

गुरुवार

आरती शेवट

(या आरतीचे वेळी श्रीमहाराज यांनी पंचारती ओवाळावयाची असते)

झाली पूजा उजळू आरती ॥ भक्‍तिभावें पूजा करु विघ्नेशी ॥ पूजेचा आरंभ करितो कुसरी ॥ कैसी पूजा तुझी न कळे अंतरी ॥ १ ॥ जयदेब जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ भक्‍तिभावे तुझे चरण ह्रदयी ॥ जयदेव ॥ध्रु०॥ उजळिले दीप मनोमानसी ॥ सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥ पूर्व पुण्य माया रचिली कुसरी ॥ भक्‍तिभावें तुज धरिले अंतरी ॥ जयदेव०॥ २ ॥ प्रपंचाची गती न कळे लौकिकी ॥ किती भोग भोगू विपरीत ध्याती ॥ म्हणुनी तुज शरण येतो (आलों) प्रतिमासी ॥ ऐसा भक्तिभाव निरोपी तुजसी ॥ जयदेव० ॥ ३ ॥ समर्थासी बोलणे नकळे मतीसी ॥ ऐसा सदोदित देखिला भक्‍तिसी ॥ मोरया गोसावी म्हणे तुजसी ॥ टाकिले वनवासी कणवाचे व्दारी ॥ जयदेव०॥ ४ ॥ अर्चन करूनि तुम्हा केली आरती ॥ सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥ भक्‍तिभावें तुझे चरण ह्रदयी ॥ जयदेव जयदेव ॥५॥