॥ पद ९ ॥
प्रथम नमू देव गणराजू ॥ देवी गौरीचा आत्मजू ॥ चतुर्भुज परशुध्वजू ॥ तो गणराज वंदू आतां ॥१॥ उपांग श्रुती टाळ मृदंग ॥ सारजा गायन करिती शुध्द ॥ तेणे रंग उडवी नानाविध ॥ गणराज (महाराज) माझा नृत्य करी ॥ २॥ साही राग छ्त्तीस भार्या ॥ आलाप करी सारजा माया ॥ धित् धित् धिम किटि नाचे गणराया ॥ रंग पहावया देव आले ॥३॥ ऐसा रंग बरवा वोजा ॥ प्रसन्न होई तूं विघ्नराजा ॥ मोरया गोसावी म्हणे दास तुझा ॥ गणराज (महाराज) माझा नुपेक्षी रे ॥४॥
॥ पद १० ॥
प्रथम नमूं देव लंबोदरू ॥ जो ऋध्दिसिध्दीचा दातारू ॥ वेद श्रुति शास्त्रासि जो आधारू ॥ तो (महाराज) गणराज नमियेला ॥१॥ रंगी उभी सारजा घन ॥ पुस्तक वीणा करिं घेउन ॥ सानु सानु ध्वनी उमटति जाण ॥ गंधर्व गायन करिताती ॥२॥ तया माजी उभे नारद तुंबर ॥ मृदंग वाजती धिमि धिमि कार ॥ टाळांचा आहे महागजर ॥ रंगी मोरेश्वर (क्रिडताती) खेळताती ॥३॥ गणगायक नृत्य करीत ॥ धिमिधिमि भूमि दणाणीत ॥ गिरि गिरि गिरि भवरे देत ॥ थाक तोडि (तक तक) ताल छंद ॥४॥ ऐसे तांडव नृत्य मांडिले ॥ विमानी देव तटस्थ राहिले ॥ मोरया गोसावी योगी बोलिले ॥ रंगि भेटले गणराज (महाराज) ॥५॥
॥ पद ११ ॥
एक भाव धरुनि जाई तूं प्राण्या ॥ शरण जाई गजानना ॥ भवदु:ख तुझे होई नाशना ॥ मग मुक्तिपद जोडियेले ॥१॥ संसारा येउनी काय त्वां केले ॥ गणराजपाय अंतरले ॥ काय त्वां प्राण्या जोडियेले ॥ सारे तुझे जिणें वायां गेलें ॥२॥ माझें माझें करितां ठकलासि मूर्खा ॥ कोण तुज सोडवील दुःखा ॥ नाम एक तारील फुका ॥ उध्दरिले देखा कर्मसंगें ॥३॥ आपुले हितां तूं कारण ॥ एकनिष्ठ धरूनि मन ॥ वेगें तुझें होईल कर्मछेदन ॥ मग जन्म मरण नाहीं तुज ॥४॥ ऐसा एकजना उपदेश केला ॥ गणराज पायीं लक्ष तुम्ही लावा ॥ चिंतामणी म्हणे स्वामी माझा सेवा ॥ नाही तुम्हा भय यातायाती ॥५॥
॥ पद १२ ॥
आम्ही मोरयाचे वेडे नेणती ॥ वेडे बागडे नाम तुझें गाऊं देवा ॥ मोरयाचे वेडे नेणती ॥१॥ एक वर्णिती नानापरी ॥ आम्ही म्हणो मोरया तारी देवा ॥ मोरयाचे वेडे नेणती ॥२॥ एक वर्णिती नाना छंद ॥ आम्ही म्हणो शुध्द अबध्द देवा ॥ मोरयाचे वेडे नेणती ॥३॥ मोरया गोसावी तुझे वेडे ॥ रंगी नाचू लाडे कोडे देवा ॥ मोरयाचे वेडे नेणती ॥४॥