श्रीमोरया गोसावी प्राप्त श्रीमंगलमूर्ती

श्रीमंगलमूर्तींचा महिमा

एकदा श्री मोरया गोसावी नेहमीप्रमाणे वारीसाठी मोरगावला गेले. तिथे देवळात मयूरेश्वराचे ध्यान करीत असता सिद्धिबुद्धिसहित श्रीमयूरेश्वराची मूर्ती त्यांच्या पुढे उभी राहिली. ते तेजस्वी ध्यान पाहताच मोरया गोसावींना अतिशय आनंद झाला व त्यांनी श्रीमयूरेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून श्रीमयूरेश्वरांनी सांगितले की, "आता तू वृद्ध झालास, वारीस येताना तुझे फार हाल होतात. ते हाल माझ्याच्याने पहावत नाहीत. तुझी वारी मला पावली. या पुढे तू वारीला येऊ नकोस. मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. उद्या गणेशकुंडात स्नान करताना तुला तेजस्वी व शेंदरी रंगाचा एक तांदळा मिळेल. ते माझेच स्वरूप आहे असे समज. तो तांदळा घेऊन चिंचवडला जा. या नंतर तो तांदळा घेऊन ज्येष्ठ, भाद्रपद, माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीसच वारीस येत जा. मी आता तुझ्याजवळच आहे. आता तू आणि मी दोन नाहीत. तुझ्या भक्‍तीमुळे आपल्यातील द्वैत आता नष्ट झाले आहे." येवढे बोलून श्रीमयूरेश्वर अंतर्धान पावले.

दुसऱ्या दिवशी मोरया गोसावींनी कऱ्हा नदीमधल्या गणेशकुंडात स्नान केले. स्नानानंतर सूर्यास अर्ध्य देत असताना तिसऱ्या अर्ध्यच्या वेळी त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा, अत्यंत तेजस्वी असा तांदळा आला. आपल्याला आज प्रसाद प्राप्त झाला म्हणून त्यांना फार आनंद झाला. ही घटना शके १४११ मध्ये घडली. नंतर मोठ्‍या समारंभाने मोरया गोसवींनी ती प्रसादमूर्ती (तांदळा) श्रीमयूरेश्वरांच्या मंदिरात आणली. ती प्रसादमूर्ती मयूरेश्वरांपुढे ठेवून आर्त भावनेंने प्रार्थना केली. त्या वेळी सर्वांच्या देखत मयुरेश्वराच्या गळ्यातील हार मोरया गोसावींच्या गळ्यात पडला. मोरया गोसावींना आनंद झाला. त्यांना वाटले की आपल्याला ही चिंचवडला जाण्याची आज्ञा मिळाली आहे. भजन करीत करीत मोरया गोसावी ती प्रसादमूर्ती घेऊन चिंचवडला आले. दुसऱ्या दिवशी वैदिक ब्राह्मण बोलावून त्या मूर्तीची यथाशास्त्र प्राणप्रतिष्ठा केली. हीच प्रसादमूर्ती सध्या चिंचवडला देऊळवाड्‍यात (श्रीमंगलमूर्ती वाड्‍यात) दिसते.