श्रीक्षेत्र मोरगाव

श्रीक्षेत्र मोरगावची माहिती:
श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावींचे वडील वामनभट्ट शाळिग्राम यांनी मोरगावला कठोर तपश्चर्या केली. म्हणून श्रीमयूरेश्वराने स्वत: त्यांचा मुलगा म्हणून अवतार घेतला. तेच पुढे मोरया गोसावी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी मोरगावची वारी सुरू केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीमयुरेश्वर चिंचवडला मंगलमूर्ती रूपाने आले.
मोरगावला थोर गणेश भक्त गणेश योगीन्द्र यांनी चोवीस वर्षे मोरयाची सेवा केली. त्यांचा मोरगावात मठ आहे. त्यांनी गणेश संप्रदायाचा प्रचार व प्रसार चालू केला. गणेश संप्रदायाच्या वाङ्मयाचे संकलन, संपादन, प्रकाशन या सारखी अनेक कामे या मठाने केली.
गणपतीच्या पूजेसाठी छत्रपती श्री राजाराम महाराजांनी मोरगाव देवांना इनाम दिले. तेव्हापासून ते चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेत आले. इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनाला येतात. भाद्रपद-माघ महिन्यात चिंचवडच्या श्रीमंगलमूर्तीची पालखी इथे येते. दसऱ्याला मोठी मिरवणूक निघते. या वेळी दारूकाम प्रचंड होते.
’मनी इच्छीले मोरया देत आहे’ अशी याची ख्याती आहे. श्री क्षेत्र मोरगावला 'भूस्वानंद' म्हणूनही नावाजतात.
श्रीमयूरेश्वर मंदिराची माहिती:


मंदिरात प्रवेश केल्यावर पश्चिमेच्या बाजूला विघ्नहर गणपतीच्या ओवरी मध्ये बसून श्री मुदग्ल ऋषिंनी मुदग्ल पुराण हे महान पुराण लिहिले. मुख्य मंदिरात गर्भागार, मुख्यागार, तीन मंडप देवता आहेत. त्यांची पूजा करुन दर्शन घ्यावे.