मोरगावचा महिमा

॥ श्री भूस्वानंदाधीशो मयुरेश्वरो विजयते ॥

निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे ॥
तुरीयायास्तीरे परमसुखदे त्वं निवससि ॥
मयूराया नाथस्त्वमसि च मयूरेश भगवन्‌ ॥
अतस्त्वां संध्याये शिव-हरि-रवि-ब्रह्म जनकम्‌ ॥

॥ कऱ्हेचे तिरी एक असे मोरगांव ॥
॥ तिथे नांदतो मोरया देव राव ॥
॥ चला जाऊ यात्रेसी महापुण्य आहे ॥
॥ मनी इच्छिले मोरया देत आहे ॥

॥ स्वर्गे शंभुगृहे चैव पाताले शेषमंदिरे पृथिव्यां तु मयुरेशे ॥

अनादिसिद्ध सर्वाद्य क्षेत्र गणेशाचे आद्यमूळपीठ श्रीगणेशाचा स्वानंद लोक, सर्व गणेश भक्तांची पंढरी अष्टविनायकांपैकी मुख्य क्षेत्र म्हणजे मोरगावचा श्री मयूरेश्वर, मोरेश्वर होय. मोरगावास भूस्वानंद म्हणतात, त्याचप्रमाणे मयुरपूर असे देखील म्हणले जात असे.

मयूरपूर(मोरगाव) क्षेत्राचे वर्णन हे पौराणिक व ऐतिहासिक दृष्टीने फार आगळे वेगळे आहे. सर्वश्रुत गणेश वर्णनामध्ये गणेश हा शिव-पार्वतीचा पुत्र आहे. म्हणून अथर्वशीर्षामध्ये "शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः" असे वर्णन आहे. श्रीमयूरेश्वर गणेश मात्र याला अपवाद आहे. कारण मुद्गल पुराणामध्ये वर्णन केल्या प्रमाणे "अतस्त्वां संध्याये शिव-हरि-रवि-ब्रह्म जनकम्‌". मोरगावचा श्रीमयूरेश्वर हा सर्वांचा जनक (पिता) आहे.

पृथ्वीवर गणेशाच्या ओंकाराची पहिल्यांदा ज्या ठिकाणी स्थापना केली ती जागा म्हणजे मयूरेश्वर क्षेत्र. या ओंकारापासून वेद निर्माण झाले. वेदांनी पंच देवांची निर्मिती केली. या पंच देवांनी ओंकाराची तपश्‍चर्या केली. त्यानंतर त्यांना ओंकारात्मक गणेशाचे दर्शन झाले. पंच देवांनी पृथ्वीवर गणेश मूर्तीची पहिल्यांदा स्थापना ज्या ठिकाणी केली ते क्षेत्र म्हणजे ज्येष्ठराज ब्रह्मणस्पती श्री मयूरेश्वर क्षेत्र होय.


श्रीमयुरेश्वरांच्या कथा

त्रेता युगामध्ये सिंधुदैत्य व कमलासूर दैत्यांनी सूर्याची उग्र तपश्चर्या करुन त्रिभुवनावर राज्य स्थापित केले होते. सर्व देवांना बन्दिवासात टाकले होते. तेव्हा पार्वती देवीने, प्रत्यक्ष शक्तिमातेने लेखनगिरी पर्वताच्या गुहेमध्ये (लेण्याद्रि पर्वतामध्ये) गणेशाची उग्र तपश्चर्या केली. तेथे साक्षात्‌ श्रीगणेश प्रकट झाले आणि त्यांनी शक्तिमातेला वर दिला. सिंधू दैत्याची सत्ता नष्ट करण्यासाठी कश्यप पत्‍नी विनिती हिच्या अंड्यापासून मोराची उत्पत्ती झाली. या मयूरावर (मोरावर) आरुढ होऊन श्रीगणेशाने सिंधू व कमलासुर दैत्यांचा वध केला. त्यानंतर त्रेतायुगामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पंच देवांनी ज्या गणेश मूर्तीची स्थापना केली. तीच ही श्रीमयुरेश्वराची मूर्ती. ही मूर्ती भाविकांना दर्शनासाठी मोरगाव येथे आहे. मोरावर बसून सिंधू दैत्याचा वध केला. म्हणून पंच देवांनी या गणेशाला श्रीमयुरेश्वर असे नांव ठेवले.