- मुख्य पृष्ठ
- चिंचवड
- मोरगाव
- सिद्धटेक
- थेऊर
- महत्त्वाचे
- डाउनलोड
- ऑनलाइन विक्री
- श्री चिंतामणी महिमा
- श्री सिद्धिविनायक महिमा
- ।। श्री मयुरेश्वर ।।मोरगाव
- सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- महासाधु मोरया गोसावी चरित्र आणि परंपरा
- श्री सदगुरू मोरया गोसावी
- योगिराज श्रीचिंतामणि महाराज चरित्र
- श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेली सनदापत्रे
- व्हिडिओ सीडी - श्री मोरया गोसावी चित्रपट
- ऑडिओ सीडी - क्षेत्र महिमा
- ऑडिओ सीडी - माझ्या मोरयाचा धर्म जागो
- ऑडिओ सीडी - श्री गणेश गीता
- ऑडिओ सीडी - आरती संग्रह
- ऑडिओ सीडी - सदगुरु श्रीमोरया गोसावी पदांचा गाथा
- उपक्रम
- फोटोगॅलरी
- पदांचा गाथा
- इतर लिंक
- संपर्क
श्रीक्षेत्र चिंचवड येथील वार्षिक कार्यक्रम
श्रीमोरया गोसावींची पुण्यतिथी
श्रीमोरया गोसावींची पुण्यतिथी हा चिंचवड संस्थानचा सगळ्यात मोठा उत्सव. मार्गशीर्ष वद्य तृतीयेपासून षष्ठीपर्यंत चिंचवडमध्ये फारच धामधूम चालू असते. रोज हजारो माणसे येऊन जातात. षष्ठीच्या दिवशी तर ४०-५० हजार भाविक जमतात. घाटावर समाधीचे दर्शन घेतात, प्रसाद घेतात, वाड्यात मंगलमूर्तींचे दर्शन घेतात. दिव्यांची आरास होते. गाणे बजावणे, भजने, कीर्तने, यांनी परिसर दुमदुमून जातो. मंगलमूर्तींची पूजा, पंचारती फक्त महाराजच करू शकतात.
मोरया गोसावी, चिंतामणी महाराज, धरणीधर महाराज यांनी पदे रचली आहेत. ही पदे रात्रीच्या वेळी विशेष प्रसंगी म्हणण्याची प्रथा आहे. या भजनाला धूपारती म्हणतात. त्या वेळी महाराजांच्या पत्नी मंगलमूर्तींची दृष्ट काढतात.
पुण्यतिथी उत्सव
पौष वद्य चतुर्थीला श्री चिंतामणी महाराज (थोरले) यांची पुण्यतिथी असते. त्याही वेळी असाच पण एक दिवसाचा सोहळा होतो. भाद्रपद शुद्ध सप्तमीला श्रीनारायण महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात. त्यावेळी देव यात्रेत असतात. सासवडला ही पुण्यतिथी होते.
सप्त पुरुषांपैकी इतरांच्याही पुण्यतिथी साजऱ्या होतात.
द्वारयात्रा
श्रावण महिन्यात पहिले चार दिवस चिंचवडच्या जवळपास चार दिशांना पिंपरी, वाकड, रावेतचा रामाडीचा डोंगर आणि आकुर्डी या ठिकाणी मांजराई, आसराई, ओझराई आणि मुक्ताई या चार द्वार देवतांची यात्रा असते. महाराज आणि इतर भक्त तेथे जाऊन जोगवा-गोंधळ इत्यादी पदे म्हणतात. पूजा करतात. परत आल्यावर उरलेली धूपारतीची पदे घाटावर करतात. घाटावरची आरती झाल्यावर सर्व भक्तांना महाप्रसाद असतो.
भाद्रपद आणि माघ वारी
भाद्रपद आणि माघ या दोन महिन्यात मोरगावला दोन वाऱ्या असतात.
भाद्रपद वारी
भाद्रपदात पालखीत मंगलमूर्ती बसवून मोठ्या थाटामाटाने पालखी निघते. पुणे-सासवड-जेजुरी या मार्गाने तृतीयेला मोरगावला पोचतात. मोरगावचे गावकरी मंगलमूर्तीचे भव्य स्वागत करतात. मिरवणुकीने येऊन मंगलमूर्ती व मोरया यांची भेट होते. चतुर्थीला कऱ्हेत मंगलमूर्ती स्नानासाठी नेतात. मंगलमूर्तीच्या स्नानाचे तीर्थ महाराज सर्व भक्तांच्या अंगावर शिंपडतात. भक्तही कऱ्हेत स्नान करुन ओलेत्याने ते अंगावर घेण्यात धन्यता मानतात. पंचमीला पूर्वी कऱ्हेच्या पलीकडे पवळी म्हणून जागा आहे. तेथे अपरंपार अन्नदान होत असे. आता अन्नदान मोरगाव येथे संस्थानच्या धर्मशाळेत होते.
परत येताना जेजुरीला गडावर खंडोबाची आणि शिवरीला यमाईची भेट होते. पुण्याला जोगेश्वरीची भेट होते. ठिकठिकाणी स्थानिक लोक पालखीचा सत्कार करतात. दर्शनाला येतात.
माघ वारी (गणेश जयंती)
माघात अशीच वारी असते. आणि यावेळी श्री मंगलमूर्तीची पालखी रथातून नेतात. येताना थेऊरला आणि सिद्धटेकला मुक्काम करतात. यात्रेत मार्ग आणि मुक्काम यात्रेकरूंच्या सोयीने ठरवतात. तृतीयेच्या रात्री मोरगावला पोहोचणे हे महत्वाचे असते. जाताना घाटावर श्री मोरयाची भेट होते. येताना इतर देवतांच्या भेटी होतात. माघी यात्रेत सिद्धटेकला सिद्धिविनायकाच्या भेटीला देव प्रतिवर्षी जात असतात.
श्री कोठारेश्वरांचा वाढदिवस
श्रावण शुद्ध षष्ठीला श्री कोठारेश्वरांचा वाढदिवस असतो. त्यावेळी महापूजा, नैवेद्य, मोठी धूपारती असते.