Jump to Navigation

संजीवन समाधी महोत्सव

श्रीमन्‌ महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा

श्रीक्षेत्र चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी हे साक्षात मोरगावच्या श्रीमयूरेश्‍वराचे अवतार होत. श्रीमयूरेश्‍वराने माघ वद्य चतुर्थी शके १२९७ (सन १३७५) रोजी मोरगाव येथील कऱ्हा नदीकाठी पवळी या ठिकाणी श्रीमोरया गोसावी या रुपात जन्म घेतला. श्रीमोरया गोसावी यांनी समाजातील अनेक लोकांचा उद्धार केला व आपले अवतार कार्य संपवून मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३ (सन १५६१) रोजी चिंचवड येथे दक्षिणवाहिनी पवनगंगा नदीच्या तटाकी योग मार्गाने संजीवन समाधी घेतली.

या निमित्त प्रतिवर्षी मार्गशीर्ष वद्य तृतिया ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी असे चार दिवस चिंचवड देवस्थान ट्रस्टचे वतीने भव्य महोत्सव साजरा करण्यात येतो. या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन याग, भजने, प्रवचने, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व भक्ती संगीत / अभंग व नाट्य संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जेष्ठ शास्त्रीय संगीत गायक आपली संगीत सेवा या महोत्सवात सादर करतात. श्रीमोरया गोसावी यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे पूर्व संध्येस विविध क्षेत्रात काम केलेल्या किमान दहा मान्यवर व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येतो. तर 'श्रीमोरया जीवन गौरव पुरस्कार' हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार एका मान्यवर व्यक्तीस देण्यात येतो. यामध्ये स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम यांचा समावेश असतो. महोत्सवाच्या चार दिवसात किमान २ लाख भाविक दर्शनासाठी येतात. षष्ठीला- समाधी दिनी किमान पन्नास हजार मोरया भक्त भोजन प्रसादाचा लाभ घेतात.

आजपावेतो हा श्रीमोरया जीवन गौरव पुरस्कार पं. हरिप्रसाद चौरसिया, लोकमान्य मेडिकल फौंडेशनचे संस्थापक डॉ. वि. गो. वैद्य, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे, श्री अजयजी शिर्के (अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन) या सारख्या मान्यवरांना देण्यात आला आहे.

संजीवन समाधी महोत्सव २०१९ आमंत्रण पत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा (Download PDF) >>

संजीवन समाधी महोत्सव फोटो २०१२ - २०१४Marathi_text | by Dr. Radut