(या आरतीचे वेळी श्रीमहाराज यांनी पंचारती ओवाळावयाची असते)
झाली पूजा उजळू आरती ॥
भक्तिभावें पूजा करु विघ्नेशी ॥
पूजेचा आरंभ करितो कुसरी ॥
कैसी पूजा तुझी न कळे अंतरी ॥१ ॥
जयदेब जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
भक्तिभावे तुझे चरण ह्रदयी ॥
जयदेव ॥ध्रु०॥
उजळिले दीप मनोमानसी ॥
सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥
पूर्व पुण्य माया रचिली कुसरी ॥
भक्तिभावें तुज धरिले अंतरी ॥
जयदेव०॥ २ ॥
प्रपंचाची गती न कळे लौकिकी ॥
किती भोग भोगू विपरीत ध्याती ॥
म्हणुनी तुज शरण येतो (आलों) प्रतिमासी ॥
ऐसा भक्तिभाव निरोपी तुजसी ॥
जयदेव० ॥ ३ ॥
समर्थासी बोलणे नकळे मतीसी ॥
ऐसा सदोदित देखिला भक्तिसी ॥
मोरया गोसावी म्हणे तुजसी ॥
टाकिले वनवासी कणवाचे व्दारी ॥
जयदेव०॥ ४ ॥
अर्चन करूनि तुम्हा केली आरती ॥
सुखे निद्रा (मोरया) करी तू मंगलमूर्ती ॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
भक्तिभावें तुझे चरण ह्रदयी ॥
जयदेव जयदेव ॥५॥
कऱ्हेच्या पाठारी नांदे मल्हारी ॥
रहिवास केला कनक शिखरीं ॥
अर्धांगी शोभे म्हाळसा सुंदरी ॥
प्रीती आवडली बाणाई धनगरीण ॥
जयदेवजयदेवजय (श्री) म्हाळसापती ॥
आरती (भावार्ती) ओवाळू तव चरणाप्रती ॥
जयदेवजयदेव ॥१॥
कनकपर्वत तुझा दृष्टी देखिला ॥
उल्हास झाला सकळा भक्ताला ॥
तयासी वाटे पैं दिनकर उगवला ॥
तयें ठायी अवतार देवा त्वां धरिला ॥
जयदेव० ॥२॥
कुळस्वामी सकळांचा मल्हारी हौसी ॥
चुकलिया भक्ता (दासा) शिक्षा लाविसी ॥
त्राहि त्राहि म्हणुनी चरणा (पाया) लागलो ॥
क्षमा करी अपराध तुज बोलिलो ॥
जयदेव ॥३॥
तुझे उग्र रूप सकळिक देखिले ॥
भय तया वाटता अभय त्वां दिधलें ॥
सकळा जनांचे भय फिटलें ॥
येऊन चरणा (पाया) पाशी तुझिया लगले ॥
जयदेव० ॥४॥
त्रिशूळ डमरू खड्ग हस्ती घेतलें ॥
वाम हस्ती कैसे पात्र शोभलें ॥
मणिमल्ल दैत्य चरणी (पायी) मर्दिले ॥
थोर भाग्य (पुण्य) त्याचे चरणी ठेविले ॥
जयदेव० ॥५॥
प्रचंड दैत्य वधुनी आनंद झाला ॥
सकळा जनांचा (भक्तांचा) होशील दातारू ॥
जयदेव० ॥६॥
नित्य आनंद होतसे सोहळा ॥
भंडार उधळण साजे तुजला ॥
भक्तजन शरण येती तुजला ॥
त्यांच्या कामना पुरविसी अवलीला ॥
जयदेव० ॥७॥
मोरया गोसावी मज ध्यानी मनी ॥
तयाच्या कृपेने (प्रसादे) वर्णिले तुज ध्यानी ॥
आणिक वर्णावया शिणली ही वाणी ॥
दास मोरयाचा म्हणजे चिंतामणी ॥
जय० ॥८॥
पूजेच्या प्रांती अभ्यंग करी ॥
झडकरी उठे स्वामी येई लवकरी ॥
रत्नखचित आसन घातले कुसरी ॥
तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥
आरती (भावार्ती) ओवाळू तुज एक चित्ती ॥
जयदेव० ॥
ध्रु ॥
पुष्प वासिक तेल आणिले अपूर्व ॥
सर्वांगी चर्चिन तुज मी सुंदर ॥
ननपरिमळसहित उटणे तुज लावी ॥
यावें यावें मोरया उशीर न लावी ॥
जयदेव० ॥२॥
उष्णोदक देवा आणिले तुजकारणे ॥
तयासी उपमा काय देऊ मी नेणे ॥
आपुले हस्ते करूनि घालिन तुज वरी ॥
सनाथ करी मोरया येई लवकरी ॥
जयदेव० ॥३॥
ऐसी करूणा ऐकुनी आले गणपती ॥
समर्पिले तयासी अनुक्रमें एक चित्ती ॥
आणुनि पीतांबर कासे कसिला ॥
तयाच्या प्रकाशे दिनकर लोपला ॥
जयदेव० ॥४॥
कस्तुरी मळवट भाळी रेखिला ॥
तयावरी मुक्ताफळाच्या अक्षता शोभल्या ॥
बवन चंदन कैसा अंगी चर्चिला ॥
अनेक पुष्पांच्या (दूर्वांच्या) माळा शोभल्या ॥
जयदेव० ॥५॥
आणुनि धूपदीप दाखविला भक्ती ॥
नैवेद्य समर्पिला तुज मंगलमूर्ती ॥
त्रयोदशगुणी तांबूल मुखी शोभतो॥
सुरंग रंगित दंत दिसतो सुरेख ॥
जयदेव० ॥६॥
सुवर्ण दक्षिणा चरणी (पायी) ठेविली ॥
पंचप्राण करूनि तुज निरांजली ॥
पुष्पांजली कैसी वाहिली तुजसी ॥
पूजा मी करू नेणे मज क्षमा करी ॥
जय० ॥७॥
सुरेख मंचक कैसा घातला मंदिरी ॥
तयावरी पासोडा शोभे कुसरी॥
नाना पुष्प याती तयावरी शोभती॥
तेथे (मोरया) निद्रा करी तू मंगलमूर्ति ॥
जयदेव० ॥८॥
ऐसे शेजेवरी पहुडले गणपती ॥
सिद्धी बुद्धि चरणसंवाहन करिती ॥
भक्तासी आज्ञा देतो गणपती ॥
आणिक वर्णूं नेणे मी अल्पमती ॥
जयदेव० ॥९॥
ऐसी शेज तुझी न वर्णवे वाणी ॥
श्रमला शेष हा राहिला मौनी ॥
कृपा करी तू दीना (दासा) लागूनी ॥
दास तुझा विनवितो म्हणे चिंतामणी ॥
जयदेव० ॥१०॥
सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्ती ॥
चित्तातीत होऊनि अनुभव भोगिती ॥
स्वानंद अनुलक्ष्य लक्षती सद्अवृती ॥
व्यक्ताव्यक्तरूपी जय ब्रम्हामूर्ति ॥
जयदेव जयदेव जय विद्याधीशा ॥
अनुभव पंचारतीं ओवाळू धीशा ॥
जयदेव ॥
ध्रु०॥
सृष्टीमाजि लोक बोलती गौरीज ॥
पाहता केवळ ब्रम्ह अवतरले सहज ॥
म्हणऊनि सहचराचरी साधिती निज काज ॥
ऐसा परात्पर हा विघ्नराज ॥
जयदेव०॥२॥
सकळा देवांमाजि तू वक्रतुंड ॥
दोषच्छेदन कामी होसी प्रचंड ॥
ध्यानी अवलोकिता पूर्ण ब्रम्हांड ॥
शास्त्रादिक शोधिता निगमागम कांड ॥
जयदेव०॥३॥
सुखसाधन मनमोहन फणिभूषणधारी ॥
हरनंदन सुरवंदन अघकंदनकारी ॥
मयूरवाहन पावन नयन – त्रयधारी ॥
सादर वरद भक्ता होय विघ्नहारी ॥
जयदेव०॥४॥
गुरवरकृपा-योगे दिसे अभेद ॥
पाहतां सर्वांठायी हा मूळकंद ॥
पठण करितो योगी निज चतुर्वेद ॥
विनवी चिंतामणी निजभावे वरद ॥
जयदेव०॥५॥
निर्गुण गुणवंता तू विध्नहरा ॥
भक्त तारावया कृपासागरा ॥
अभय वरद हस्त तू परशुधरा ॥
भवसिंधुतारक तू करूणाकरा ॥
जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
आरती (भवार्ती) ओवाळू तव चरणकमळा ॥१॥
||ध्रु०॥
सिंहासन कुसरी मिरवति ठसे ।
तेज महा कोटि भानु प्रकाशे ॥
तयावरी सुकुमार गणराज (महाराज) बैसे ॥
ब्रह्मादिक स्तविताती मुनिजन संतोषे ॥
||जयदेव०॥
कनक मंडपावरि कलश शोभती ॥
हिरेजडित रत्नक्रीडा फाकती ॥
ध्वजा पताका वरि मिरवती ॥
अकळे नकळसी कवणा हा मंगलमूर्ती ॥
||जयदेव०॥
षोडशविधि पूजा झाली गणपाळा ॥
नरसुगण गंधर्व आनंद सकळा ॥
सिध्दि बुध्दि सहित होतसे सोहळा ॥
लिंबलोण करी उमावेल्हाळा ॥
||जयदेव०॥४॥
अष्टभावे आरती आनंदमूर्ती ॥
निजबोधे ओवाळू कल्याणकीर्ती ॥
मोरया गोसावी करीतो विनंति ॥
शरणागता तारि तू मंगलमूर्ती ॥
||जयदेव०॥५॥
(मोठया धुपार्तीचे वेळीं वरील आरती म्हणावयाची असते)
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥
अगम्य गम्य रूप आनंदघन ॥
मयुरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥
ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥
जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥
आदि पुरुषा भाळी चंद्र त्रिनयना ॥
कृपा अमृतघन भवताप शमना ॥
उजळू अष्टभावे आरति तव चरणा ॥१॥
सहस्रवदने शेष वर्णिता झाला ॥
न कळे तुमचा महिमा स्तवितां श्रमला ॥
मौन धरुनि वेद श्रुति परतल्या ॥
तोचि (हाची) विश्वंभर मोरेश्वर अवरतला ॥२॥
कोटि सूर्यप्रकाश कोटि (शशि) निर्मळ ॥
सर्वात्मा सर्वां जीवी जिव्हाळा ॥
मोरया गोसावी पाहे अवलीला ॥
देव भक्त प्रेमे घेती सोहळा ॥३॥
चिंतामणी परिपूर्ण देवाधिदेव ॥
ब्रम्हांडी माया ही रचिली त्वां सर्व ॥
प्रपंच सुखदु:ख तुझें वैभव ॥
अखिल जन नेणती हा गुह्य भाव ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ती ॥
पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांती ॥
जयदेव ॥
निगमागम वर्णिता नकळेचि पारु ॥
भक्त जन कृपाळू हा मोरेश्वरू ॥
साधुपरिपालना धरीला अवतारू ॥
निर्विकल्प सेवा हा कल्पतरू ॥
जयदेव०॥२॥
शंकर जनक ऐसी पुराणे गाती ॥
परिसकळांचा जनिता हा मंगलमूर्ती ॥
अगाध याचा महिमा नकळे कल्पांती ॥
थोर पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्ति ॥
जयदेव०॥३॥
निजभावें पूजन आरतियुक्त ॥
खिरापती नाना फळे अणिति भक्त ॥
एक आरति करिती पूजन नित्य ॥
निंद्क कपटीबुध्दि ठेकले बहुत ॥
जयदेव०॥४॥
मोरया गोसावी भक्त किंकर ॥
थोर भाग्य (पुण्य) माझें हा मोरेश्वर ॥
निंदक कपटी बुध्दि निणति हा पार ॥
गोसावी न म्हणावा हा मोरेश्वर ॥
जयदेव०॥५॥
विरक्त साधुशील नेणति कुसरी ॥
महानुभावामध्ये अगाध ही थोरी ॥
सर्वांभूती भजन समावैखरी ॥
पाहति ही पाऊले धन्य संसारी ॥
जयदेव०॥६॥
भक्तराम म्हणे मोरेश्वरमूर्ति ॥
नित्यानंद शरण कल्याण कीर्ति ॥
तोडिसी मायाजाळ संसार भ्रांती ॥
अंत किती पाहसी नागाननव्यक्ती जयदेव ॥७॥
आधारचक्र नृत्य मांडिले थोर ॥
टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥
ब्रह्मा विष्णु आणि उभे शंकर ॥
निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरती (भावार्ती) ओवाळू निर्गुण निजरूपा ॥ जयदेव ॥ ध्रु०॥
नृत्य करितां शेष करी डळमळ ॥
कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥
भारें वराह दाढा उपडो (पाहे) समूळ ॥
गिरि गिरि भवरें देत सप्तही पाताळ ॥ जयदेव ॥२॥
कड कड कड आकाश तडके दारुण॥
गड गड गड गर्जे गर्जे गगन॥
चळ चळ चळ पृथ्वी कापे त्रिभुवन ॥
धिग धिग धिग नृत्य करि गजनन ॥ जयदेव॥३॥
तेहेतिस कोटि देव वर्णिती सीमा ॥
परमानंद पूर्ण ब्रह्म परमात्मा॥
अगणित गुण सागर भाळी चंद्रमा॥
नातुडें सुरवरा न कळे महिमा ॥ जयदेव॥४॥
ऐसे तांडवनृत्य झालें अद्भुत॥
हरि हर ब्रह्मादिक उभे तटस्थ ॥
मोरया गोसावी योगी ध्यानस्थ॥
एकरूप होउनी ठेले द्वैता अद्वैत ॥ जयदेव ॥५॥