खंडोबाचे पद

दिव्य मूर्ति महिपती ये ये हा देखिलें दृष्टी ॥
सुवर्णवर्ण शोभायमान हळदीच्या गात्री ॥१॥

जय जय मल्हारी ये ये हा मार्तंड भैरवा ॥
ब्रह्मादिक उभे सनकादिक पुढे करताती सेवा ॥ध्रु०॥

शामकर्ण अश्‍वारूढ ये ये हा होऊनी निजमंत्री ॥
डावे हाती भंडाराचे घेऊनी सत्पात्री ॥२॥

म्हाळसा पृष्ठी घेऊनी ये ये हा हा नवरा शोभे ॥
भंडार उधळती येळकोट उभे ॥३॥

शिरी बिल्व पत्रे माळा ये ये हा पुष्पाची प्रभा ॥
बाशिंगाला शोभा आली माळांच्या गर्भा ॥४॥

अनेक दैत्य वधुनी घाली ये ये हा पायी तोडरु ॥
पीत वस्त्रावरी माळा दिसे अलंकारु ॥५॥

धावा करिता धांव घेसी ये ये हा भक्त सुखकारु ॥
जारण मारण स्तंभन याचा करिसी संहारू ॥६॥

खड्‌ग उजवे हाती ज्याच्या ये ये हा तीक्ष्ण लखलखीत ॥
श्‍वाने घेउनी समागमे चाले दुडदुडीत ॥७॥

वाघ्या मुरळ्या उभया पुढे ये ये हा स्तवीत समस्त ॥
कामार्थाचे मनोरथ स्वामी पुरवितो ॥८॥

कुलस्वामी माझा होऊनी ये ये हा कुटुंब रक्षीसी ॥
जेजुर गडावरी राहुनी प्रताप मिरवीसी ॥९॥

निदान समयी तुजला स्तविता ये ये हा आरिष्ट वारीसी ॥
आरती हाती घेऊनी विघ्नेश्‍वरे स्तविलासी ॥१०॥

जयजय मल्हारी ये ये हा मर्तंड भैरवा ॥
ब्रह्मादिक उभे सनकादिक पुढे करिताती सेवा ॥११॥

पद ७२

मोरेश्वरा विधिजावरा ये ये हा चरण सुकुमारा ।।
दावी नयनी धीरा नेई माहेरा ॥ ध्रु०॥

संचित प्रारब्धासी ये ये हा आलो जन्मासी ।
माझा मी सासुरवासी पडिलो भ्रांतीसी ॥ १ ॥

माझें माझे म्हणतां ये ये हा आयुष्य सत्ता ।
व्यर्थ गेलें आतां मज धांव रे एकदंता ॥२॥

धांव रे पाव रे दीनराया ये ये हा गेलो मी वायां ।
पतितासी उद्धरी या पवन गुणवर्या ||३||

जन्मोजन्मी तुज न सोडी यें ये हा पायी मुकुंडी ।
दिधली बापा न करी सांडी चरण न सोडी ॥४॥

माथा मुकुट रत्नजडित ये ये हा कुंडली तळपत ।
केशर भाळी मृगमद टिळा झगझगीत ॥५॥

प्रसन्न वदन मनोहर ये ये हा शिरी दूर्वांकुर ।।
आयुधे सहित चारी कर दे अभयवर ॥६॥

चंदनचर्चित पुष्पमाळा ये ये हा नवरत्न गळां ।।
यज्ञोपवीत आंगुळ्या नखी चंद्रकळा ॥७॥

लंबोदरा रत्नदोरा ये ये हा कटी पितांबर ।।
सरे जानु जंघा पोटऱ्या वाकी तोडऱ्या ॥८॥

हिरे जडित सिंहासनी ये ये हा पाऊले दोन्ही ।।
दाविनले देवावाणी ते मनुजा धणी ॥९॥

सिद्धिबुद्धि दोही हाती ये ये हा चवऱ्या ढाळिती ।।
पादुका घेउनी उभा हाती बाळ गर्जे किती ॥१०॥

थयथय अप्सरा नाचती ये ये हा गंधर्व गाती ।।
टाळ मृदंग वाजविती देवा ओवाळिती ॥११॥

मोरेश्वरा विधिजावरा ० ॥

पद ७१

भीमातटीं स्थळ भूमि सिध्दटेक ॥
तेथे प्रकट झाला सिध्दिविनायक ॥१॥

महाविष्णु प्रति धरिला अवतार ॥
सकळ देवांचा तूं हो ज्येष्ठराज ॥२॥

गणेशमंत्र जप केला हो विष्णूनें ॥
त्याची कार्यसिध्दी हो झाली तेथें ॥३॥

मधुकैटभ दैत्य वधिला तत्क्षणीं ॥
ऐसा प्रताप गणेश नामाचा ॥४॥

महासिद्ध स्थळ नांदे विनायक ॥
करी भक्‍ताची सिध्दी निरंतर ॥५॥

ध्याये मोरया गोसावी ॥
तेणें आम्हा जोडले गणराज ॥‍६॥

त्याचे जगन्नाथ विनवी गजानन ॥
त्यासी देई नाम ध्यास हो एकरूप ॥७॥

पद ७०

सिध्दटेकवासी हो सिध्दिविनायक ॥
त्रिगुणनायक हो नमियेला ॥१॥

सिध्दिबुध्दि आई हो अष्टसिध्दि माता ॥
लक्षलाभ भ्राते बंधु माझे ॥२॥

भगिनी सतरावी हो माझी भीमरथी ॥
सद्‍गुरु नांदती हो तये तीरीं ॥

सत्वगुणी चला हो उंच त्या पर्वतीं ॥
सिध्दिनाथा ध्याती हो विष्णु तेथें ॥४॥

महादेव तो रवी हो स्तविती शिवाई ॥
अखंडित राही हो प्राण्या तेथे ॥५॥

भगवंत दास हेंचि हो मागत ॥
जन्मोजन्मीं देई हो हेंचि मज ।६॥

पद ६९

(एकादशीस म्हणावयाचे पद)

माझी मयुरपुरी हीच पंढरी ॥
नाम गर्जे अंबरी ॥ध्रु०॥

माझी विठ्ठलमूर्ती देवळांत ॥
शोभे शेदुरचर्चित ॥

अहो दुर्वांकुर तुळसी दळ ॥
शोभे शिरीं अद्‍भुत ॥
माझी म. ॥१॥

आहे शुंडादंड कटीवरी ॥
शोभे हाताच्या परी ॥

भक्‍तिभाव दृढ धरी ॥
पाय तया विटेवरी ॥
माझी म. ॥२॥

अहो रुक्‍मिणी राधा सिध्दी बुध्दी ॥
वरी चवऱ्या ढाळिती ॥

अहो नित्य भेटि देउनिया ॥
दिधली भक्‍तांच्या आधि ॥
माझी म. ॥३॥

ब्रह्म कमंडलू भीम गंगा ॥
गणेशतीर्थ चंद्रभागा ॥

अहो तेहतिस कोटी देव येती ॥
नित्य स्नानाच्या योगा ॥
माझी म. ॥४॥

अहो भैरव भाई पुंडलीक ॥
कल्पवृक्ष कळंबक ॥

अहो विघ्नेश्‍वर दास बोले ॥
सूक्ष्म गाईचा (पाईचा) रक्षक ॥
माझी मयुरपुरी हीच पंढरी ॥
नाम गर्जे अंबरी ॥५॥

पद ६८

नलगे गोरांजन नलगे वनसेवन ॥
नामाचे कारण भेटी देई बाप ॥१॥

नलगे ध्यान मुद्रा समाधी आसन ॥
नामाचे कारण भेटी देई बाप ॥२॥

नलगे कला तर्क नलगे ब्रम्हज्ञान ॥
नामाचे कारण भेटी देई बाप ॥३॥

नलगे मंत्रशक्ती दैवतपूजन ॥
नामाचे कारण भेटी देई बाप ॥४॥

मोरया गोसावी योगी स्मरे गजानन ॥
नामाचे कारण भेटी देई बाप ॥५॥

पद ६७

उध्दरिलें जीव नकळे तुझा महिमा ॥
म्हणुनि तुझिया नामा शरण आलों बाप ॥१॥

अहो जडजीव तारिले संख्या नाहीं त्यासी ॥
आस तूं आमची पुरवी देवा बाप ॥२॥

अहो भवार्णवीं बुडतों धावे धावुनियां ॥
तेथील यातना काय सांगू (बोलूं) बाप ॥३॥

आहे यातनेचें भये लागलों कांसे ॥
न धरी तूं उदास दीना (दासा) लागी बाप ॥४॥

आहे तुझिया नामस्मरणें पापे झालीं दहन ॥
रात्रंदिवस चिंतन आहे मज बाप ॥५॥

अहो तुझिया चरणकमळी मन माझे लुब्धलें ॥
दास चिंतामणि विनवितसे बाप ॥६॥

पद ६६

मोरया तूं जनक हो ॥
कृपाळू (दयाळू) तूं आमुची म्हणवुनी ॥
दुरुनी आलों तुज बा टाकुनी हो ॥
कृपा करी ( दया करी ) या दीना अनाथा लागुनी ॥१॥

तुझे (तुमचे) आदिस्थान मोरेश्‍वरी हो ॥
अष्टमहासिध्दी उभ्या हो तुमचे व्दारी ॥
तुम्हां (तुमचे) येणे झाले येथवरी ॥
चिंचवड पुण्य हो क्षेत्र भारी ॥२॥

पवनगंगा आहे हो सुस्थळ ॥
अनुष्ठानयोग्य तें र्निमळ ॥
गोसावी तुझा अंश तो (हा) केवळ ॥
अनुष्ठान करितो सोज्वळ ॥३॥

दर्शन (स्मरण) मात्रे होतसे पावन हो ॥
सकळा कर्माचे (पापाचे) दहन ॥
एवढे थोर तुमचे महिमान हो ॥
गोसाव्यासी लाधले (मोरयासीं जोडलें) निधान ॥४॥

तुझे (तुमचे) ध्यान धरूनियां एक हो ॥
सकळिक टाकिला लौकिक ॥
विनटलो चरणी निकट हो ॥
मोरया गोसावी दोन्ही एक ॥५॥

मोरया तूं जनक जननी हो ॥
कृपाळू (दयाळु) तूं आमुचा म्हण‍उनी ॥
तुझा छंद (वेधू) रात्रंदिवस मनी हो ॥
कृपा (दया) करी या दीना (अनाथा) लागुनी ॥६॥

पद ६५

अहो जोडला मोक्षदाता ॥
भुक्ति मुक्ति यासी मागू ॥

अहो तारील हा जन्मोजन्मी ॥
चरणीं (पायीं) याचे रे राहो ॥

आहे उध्दरिले अनंत कोटी ॥
आम्हा तारी जगजेठी ॥

माझ्या चिंतोबाचा (चिंतामणीचा) धर्म जागो ॥
ध्रु० ॥

अहो चिंचवडी रहिवास नाम मोरया देव ॥
पुरवी तो मनकामना ॥
म्हणुनि चिंतामणी नाम ॥१॥

अहो चिंता माझी हरी देवा ॥
चुकवी जन्मयातना ॥
माझ्या ० ॥२॥

अहो अज्ञान बाळ तुझे देवा ॥
आलों तुझिया ठाया ॥

अहो कृपा करी देवराया ॥
लावी आपुल्या पाया ॥

अहो न सोडी बा चरण (पाय) तुझे ॥
आणिका ठायासीं नव जाये ॥
माझ्या० ॥३॥

अहो बुध्दिहीन पांगूळ मी ॥
आलों तुझिया ठाया ॥

अहो नुपेक्षी तूं देवराया ॥
देई भक्तिसोहळा ॥

अहो मन माझे गुंतलेंसे ॥
कोठें नव जाय देवराया ॥
माझ्या चितो० ॥४॥

अहो मजवरी कृपा करी ॥
सेवा आपुली घेई ॥

अहो चिंतामणी गोसाव्यांनी ॥
कृपा (दया) मजवर केली ॥

अहो कृपे (दये) स्तव जोडी झाली ॥
गेल्या पापाच्या राशी ॥
माझ्या चिंतो० ॥५॥

अहो आणिक एक विनंती ऐक ॥
भक्ता तारी तूं सनाथ ॥

अहो कृपा (दया) मज बहुत करी ॥
विनवी नारायण दीन ॥

अहो चरणापासून न करी दुरी ॥
चरण (पाय) धरिले दृढ भारी ॥
माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥६॥

याचे चरणीं लक्ष लागो ॥
याची सेवा मज घडो ॥
याचे ध्यान हृदयी राहो ॥
माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥

पद ६४

अहो चला रे सखयांनो ॥
जाऊ मोरेश्वरा ॥
पाहू त्या सुंदरा मोरयासी ॥१॥

आम्ही गेलो मोरेश्वरा ॥
देव देखिला मोरया ॥
सेंदूर डवडविला घवघवीत ॥२॥

अहो घवघवीत रूप ॥
रूप देखिलें (पाहिलें) म्यां डोळा ॥
त्याच्या पाया वेळोवेळा लागू आता ॥३॥

अहो आता एक करु ॥
जाऊ मोरेश्वरा ॥
त्याचे ध्यान धरू रात्रंदिवस ॥४॥

अहो रात्रंदिवस जप ॥
जप करू मोरयाचा ॥
सकळ सिध्दींचा (बुध्दीचा) हाचि दाता ॥५॥

अहो दातारू आमुचा ॥
होशिल (मोरेश्वरा) विघ्नहरा ॥
लिंबलोण करा मोरयासी ॥६॥

अहो मोराया हो माझी ॥
माझी मंगलाची निधी ॥
त्रिभुवन वेधी लावियेलें ॥७॥

अहो लावियेले आम्हां ॥
आपुली ही सोय ॥
मोरया गोसावी दास तुझा ॥८॥

मराठी english