पूजा प्रांत आरंभिला ॥
विघ्नराज संतोषला ॥१॥
तुम्ही चलावे चलावे ॥ सिद्धि बुद्धि मंदिरासी ॥ ध्रु०॥
उद ऊदउनिया मंदिर ॥
लिहिले चित्रे हे सुंदर ॥ तु. च.॥२॥
रत्नजडित मंचकावरी ॥
शोभे भूपती सुंदरी ॥ तु. च. ॥३॥
वरी पासोडा क्षीरोदक ॥
शोभे अनुवार अनेक ॥ तु. च.॥४॥
लवुनिया रत्नदीप्ती ॥
सेवेलागी उभ्या शक्ती॥ तु. च.॥५॥
मुक्ताफळाचा चांदवा॥
वरी बांधिलासे बरवा ॥ तु. च. ॥ ६ ॥
सुगंध द्रव्यें सिध्दी हाती ॥
चरणा संवाहन लागे बुध्दी ॥ तु. च.॥ ७ ॥
सुगंध द्रव्य आणुनी ॥
तुज समर्पाया लगुनी ॥ तु. च. ॥८॥
पायघडीला लागी शेले ॥
त्यासी कस्तुरी परिमळ तु. च. ॥ ९ ॥
करुणा वचनी विनविले ॥
महाराज संतोषले. ॥ तु. च. ॥ १० ॥
येउनि मंदिरी पावले ॥
भक्त आज्ञा हे लाधले ॥ तु. च. ॥ ११ ॥
महाराज मंचकावरी ॥
बैसुनि सुखे निद्रा करी ॥
तुम्ही पहुडावें पहुडावें ॥
सुखें सुमन-शेजेवरी ॥ १२ ॥
सिध्दि बुध्दि चरण चुरी ॥
दिनासी तांबुल दिधला करी ॥
तुम्ही पहुडावें पहुडावें ॥
सुखें सुमन शेजेवरी ॥ १३ ॥
घेउन पदुका शिरी ॥
उभा नारायण द्वारी ॥
तुम्ही पहुडावें पहुडावें ॥
सुखें सुमन शेजेवरी ॥१४॥
© 2025 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper