कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते. त्या गावी श्रीवामनभट्ट शाळिग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते. श्रीवामनभट्ट हे देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक होते तर त्यांच्या पत्नी सौ.पार्वतीबाई ह्या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या. परंतु एक दु:ख त्यांच्या मनाला जाळत होते, त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्नी बरोबर तीर्थयात्रा करत ते इ.स.१३२४ मध्ये मोरगावला आले. मोरगावला ‘भूस्वानंद’ म्हणतात. श्रीवामनभट्ट यांनी ठरवले की, पुत्रप्राप्तीसाठी संकल्प करून अनुष्ठान करायचे, व तपश्चर्या करून श्रीमयूरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अश्याप्रकारे त्यांनी ४ तप {४८ वर्ष} अनुष्ठान केले. एके दिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयूरेश्वर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, “वामना तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला, तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन”. वामनभटांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या वेलीला साक्षात्कारचे फूल उमलले. प्रत्यक्ष मयूरेश्वर पुत्ररूपाने आपल्या घरात नांदणार या परते भाग्य कुठले? थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व नवमासपूर्ण होताच श्री शालिवाहन शके १२९७ इ.स १३७५, विधातरूनाम संवत्सर, माघ शुद्ध चतुर्थी, शुक्रवारी, रेवती नक्षत्र, द्वितीय चरण माध्यान्हकाळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयूरेश्वररूपाने मुलाची प्राप्ती झाली, मुलाचे नाव ‘मोरेश्वर’ असे ठेवले सर्वजण प्रेमाने त्याला ‘मोरया’ म्हणत.
वयाच्या ८ व्या वर्षी मोरयांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या, गायत्री जप, सूर्योपासना, अग्निउपासना आणि अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरविले. अष्टविनायकातील प्रत्येक क्षेत्री ते अनुष्ठान करीत व त्या गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ठेवत व पुढे जात. या मागे भविष्यातील एक संकेत होता. गणेशभक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा यामागील हेतु होता. स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते व पुढील सात पिढ्यांमध्ये गणेशाचे अंशरूपाने अस्तित्व होते. अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच श्रीमोरयांना श्री सदगुरू नयनभारती गोसावी यांचे रूपाने सद्गुरु प्राप्ती झाली व त्यांना श्रीनयनभारती गोसावी यांनी कफनी, रुद्राक्षाची माळ, कमंडलू दिले व मंत्रउपदेश देत श्रीमोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यामुळे लोक त्यांना ‘गोसावी’ संबोधू लागले. त्याचवेळी श्री मयूरेश्वराने दृष्टांत दिला की, “तू आता पवना नदीच्या तीरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन राहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा”. त्यानंतर मोरया चिंचवडला आले, व त्यांनी ताथवडे येथील केजूबाई मंदिर येथे वास्तव्य केले. मयूरेश्वराच्या आज्ञेप्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड ते मोरगाव वारी करू लागले. श्री मयूरेश्वराच्या आज्ञे प्रमाणे श्री मोरयांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला व वयाच्या ९६व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव त्यांनी उमा असे ठेवले. पुढे श्री थेउरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्याप्रमाणे वयाच्या १०४व्या वर्षी श्रीमोरया व उमा मातांच्या पोटी श्री चिंतामणीने जन्म घेतला. श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज वयाच्या ११७व्या वर्षांपर्यंत मयूरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगावची वारी करत होते. पण वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. मंदिराचे द्वार पूजाऱ्यांनी बंद केले होते. श्रीमोरया तिथेच असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकूळ होऊन मयूरेश्वरचा धावा करू लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. “तुझीये भेटीची बहू आस रे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया” हा धावा मयूरेश्वरांनी ऐकला व पालनहार श्रीमयूरेश्वर मोरयांच्यासमोर प्रकट झाले व मोरयांना म्हणाले, “अरे मोरया कशासाठी एवढा अट्टहास करतोस, आपल्यातले द्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहोत”, असे म्हणून श्री मयूरेश्वराने त्यांना सांगितले, “तू आता वृद्ध झालास, मोरगावास येताना तुझे फार हाल होतात, ते माझ्याच्याने पाहवत नाहीत, तुला आता मोरगावास येण्याची गरज नाही, मीच तुझ्या बरोबर चिंचवडला येतो”. दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीत सूर्याला दुसरे अर्घ्य देत आसताना तांदळारूपी श्रीमंगलमूर्ती हातात प्रकट झाले, आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की, “भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील ” आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला. श्री मोरया गोसावी महाराज हे श्रीमयुरेश्वराचे अवतार होते, त्यामुळे महाराष्ट्रात आज गाणपत्य संप्रदायाची जी उपासना दिसते त्याचे ते प्रवर्तक मानले जातात.
हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला श्रीमोरया महाराज फार महत्व देत. अन्नसत्र, यात्रा-उत्सव, पूजा-अर्चा यामुळे चिंचवड सदैव गजबजू लागले. श्री मोरया गोसावी महाराज यांना जनसंपर्कामुळे साधनेत व्यत्यय येत होता. त्यांनी मयूरेश्वराकडे संजीवन समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री मयूरेश्वराने त्यांना अनुज्ञा दिली. त्यांच्या आज्ञेनुसार इ.स. १५६१, मार्गशीर्ष वद्य षष्ठी रोजी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यावेळी श्रीमहाराजांचे वय १८६ वर्षे इतके होते. पवनेचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्तांची पावले चिंचवड कडे वळू लागली.
© 2024 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper