आरती ४

अहो अनुपम्य दिव्य शोभा रविकोटी भ्रूकुटी त्रिपुंड रेखियेला ।
मृगनाभि लल्लाटी मुखप्रभा काय वर्णू ।
दिव्य कंदपकोटी कुंडले रत्‍नदीप्ति देवा कुंडले रत्‍नदीप्ति ।
पदक शोभे कंठीं । जयदेवा धुंडिराजा ।।१।।

जय मूष्कध्वजा आरती ओवाळिन ।
अभय वरद सहजा । जयदेवा धुंडिराजा । ध्रु।१।

अहो सुंदर मुक्तमाळा पुष्पहार रुळती आजानु बाहुदंड ।
बहिवट शोभती डुलती चारी भुजा ।
दशांगुले मिरवती आयुधें सहित देखा ।
देवा आयुधे साहित देखा ।
बाप मंगलमूर्ति । जयदेवा धु ।।२।।

अहो स्थूल हे दोंद तुझे वरी उटी पातळ विचित्र नागबंध ।
शोभे नाभिमंडळ चौदा विद्यांचे भवन ।
निर्मळ कसिला पीतांबर ।
देवा कसिला पीतांबर ।
वरी रत्‍न झळाळ । जयदेवा ।।३।।

मेखळा रत्नजडित जानु जंघा नागरा पोटऱ्या गुल्फ दोन्ही ।
अंदुवाकी साजिऱ्या तोडरू रुळताती ।
महाधाक असुरा पाउले काय वर्णू ।
देवा पाउले काय वर्णूं ।
तेजे लोपल्या तारा । जयदेवा ।।४।।

योगिया ध्यानी गम्य सिंहासनी गणपती उभ्या चारी शक्ती ।
सामवेद२ स्तविती घालिती विंजणवारे ।
वरी चवऱ्या ढाळिती गोसावी योगियाच्या मोरया गोसावी योगियाच्या ।
ध्यानीं मंगल मूर्ती । जयदेवा धुंडिराजा ।
जय मूष्कध्वजा ।।५।।

 

 

आरती ३

मंगलमूर्तिराजा नमियेला देव मनोमय एकचित्ते ।
ऐसा धरुनिया भाव मोरया प्रसिध्द हा ।
त्रयलोकींचा राव पुरवितो मनकामना ।
कैवल्य-उपाव जय देवा विघ्नराजा ॥१॥

नमो गौरीआत्मजा आरती ओवाळीन ।
पावे चिंतिल्या काजा जय देवा विघ्नराजा ॥ध्रु०॥

अहो एकदा जाऊ यात्रे ।
एकदंत हा पाहू येउनि मयुरपुरी ।
अहो येऊनि ब्रह्मादिक ।
हरिहर हा राहे येउनि नाही जाणे ॥
येथे धरिला ठाव ॥ जय० ॥२॥

अहो ॠध्दिसिध्दि फळदायक ।
देवा तूचि गा होसी रक्षुनी चरणाप्रती ।
भय नाही तयासी रौरव कुंभीपाकी ।
भुक्ति मुक्ति तयसी रक्षूनि शरणागता ।
विघ्नराज तू होसी ॥जय०॥३॥

अहो चिंतिल्या चिंतमणी फळ इच्छिलें ।
देती चौव्दारी कष्ट१ करीती ।
एक कामना ध्याती चहुं युगी तूचि देवा ।
आदि वेदशास्त्रासि चतुर्मुखी वर्णी ब्रह्मा ।
कामधेनु आमुचि ॥जय०॥४॥

अहो तरुण वृध्द बाळ महाद्वारी ।
धावता तत्काळ सिध्दी त्यासी ।
भक्तवत्सल होसी तारक पूर्ण ब्रह्म ।
दृष्टि पाहे तूं आतां त्रयलोकी तुचि देवा ।
कल्पवृक्ष तू दाता ॥जय०॥५॥

अहो मोरया दास तुझा विप्र कुळीं ।
उत्तम मानसी नामे तुझे ।
तया पावले वर्म म्हणुनी या विश्‍व मुखी ।
पूर्ण पाहता ब्रह्म महाराज देव धन्य ।
नाही जाणता नेम ॥ जयदेवा० ॥६॥

आरती २

पूजेचा आरंभ मांडिला भक्तांनी ।
उशीर तू न लावी येई धावोनी ॥१॥

जयदेव जयदेव जय जय हेरंबा स्वामी हेरंबा ।
लवकर यावे स्वामी वेगि यावें स्वामी पूजाआरंभा ।
सोडून निरगुंठी चरणा झाडीन पाया लागेन ।

पंचप्राण ज्योती तुज ओवाळीन ॥ ध्रु०॥

दीनवचने परिसोनि वेगे उठिला ।
मूषक सिद्ध करुनि आरूढ पै झाला ।
रत्न सिंहासनी येऊन बैसला ।
थोर भाग्य (पुण्य) माझे आनंद झाला ॥ जय ॥२॥

आणुनि धूपदीप तुज दाखविला ।
खिरापति नैवेद्य तुज समर्पिला ।
याचे भक्षण करी गणपती ।
अनाथ तुझे मोरया (देवा) येतो काकुलती ॥ जय ॥३॥

षड् पक्वान्ने आणिक फल जाती ।
काय न्यून तूज म्हणे मंगलमूर्ति ।
त्रयोदशगुणी तांबूल मुखी सेवाजी ।
दक्षिणा अल्प म्या ठेविली देवाजी ॥जय ॥४॥

घेउनी निरांजन तुज ओवाळीन ।
मंत्रयुक्त पुष्पांजली तुज समर्पीन ।
त्राहे त्राहे म्हणूनि चरणा (पाया) लागलो ।
क्षमा करी अपराध तुज बोलिलो ॥जय॥५।।

एक विनंती स्वामी तुज करितो ।
तुझा नामघोष तुजपुढे गातो ।
वेडे बागडे रंगी नाचतो ।
परिस माझी देवा तुज विनवितो ॥जय॥६।।

नेणो कळा कुसरी थोरथोरापरी ।
नकळे मज काही बहुता प्रकारी ।
वेडे आज्ञान तुजपुढे गाऊ ।
आणिक चाड नाही तुजवाचोनी ॥ जय ॥७।।

अनेक भक्त तुझे आहेत उदारा आहेत दातारा ।
तयामाजी अज्ञान नमि मोरेश्वरा ।
वेडे अज्ञान म्हणे चिंतामणी ।
परीस माझी देवा विनंती तव चरणी ॥ जय ॥८।।

आरती १

श्री गणेशाय नम: ॥

श्रीमोरया आदि अवतार तुझा अकळू कऱ्हे पाठारीं ब्रह्मकमंडलु गंगा ॥
रहिवास तये तीरी ॥
स्नान पै केलिया हो ॥
पापताप निवारी मोरया- दर्शन ॥
देवा मोरया- दर्शन ॥
जन्म मरण पै दूरी जयदेवा मोरेश्वरा ॥१॥

जय मंगलमूर्ती आरती चरणकमळा ॥ ओवाळू प्राणज्योति जयदेवा मोरेश्वरा ॥ ध्रु० ॥

अहो सुंदर मस्तकीं हो ॥
मुकुट दिसे साजिरा विशाळ कर्णव्दये ॥
कुंडले मनोहर त्रिपुंड्र टिळक भाळीं ॥
अक्षता तेजस्वर प्रसन्न मुखकमल ॥
देवा प्रसन्न मुखकमल ॥
मस्तकीं दूर्वांकुर जयदेवा मोरेश्‍वरा ॥ जय मं० ॥२॥

अहो नयने निर्मळ हो ॥
अति भोवया सुरेख एकदंत शोभताहे ॥
जडिली रत्‍नें माणिक बरवी सोंड सरळ ॥
दिसती अलौकिक तांबुल शोभे मुखी ॥
देवा तांबुल शोभे मुखी ॥
अधर रंग सुरेख जयदेवा मोरेश्‍वरा जय मं ० ॥३॥

चतुर्भुजमंडित हो शोभती आयुधें करीं ॥
परशु कमळ अंकुश हो मोदक पात्रभरी ॥
अमृत फळ नागर सोंड शोभे तयावरी ॥
मूषक वाहन तुझे ॥
देवा मूषक वाहन तुझे ॥
लाडू भक्षण करी ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥४॥

नवरत्‍न कठीं माळ ॥
यज्ञोपवीत सोज्वळ ताइत मिरवतसे ॥
तेज ढाळ निर्मळ जाई जुई नाग चाफे ॥
पुष्पहार परिमळ चंदन कस्तुरी हो ॥
देवा चंदन कस्तुरी हो ॥
उटी घेऊन परिमळ ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥५॥

अहो प्रसन्न दिसे दोंद ॥
तयावरी नागबंध सर्वांगि सेंदुर हो ॥
वरि मिरवे सुगंध नाभिमंडळ सुरेख ॥
विद्दा करिती आनंद कटिसूत्र शोभताहे ॥
देवा कटिसूत्र शोभताहे ॥
मेखळा कटिबंध ॥ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं ० ॥६॥

सुकुमार जानु जंघा पवित्र चरण- कमळ वर्तुळाकार घोटी ॥
टाचा दिसे सोज्वळ पाउले काय १ वर्णू ॥
अंगुलिका सरळ नखि चंद्र मिरवतसे ॥
देवा नखि चंद्र मिरवतसे ॥
भ्रमर घेती परिमळ जयदेवा मोरेश्‍वरा जय मं० ॥७॥

अहो चरणी तोडर वाकि ॥
अदुंनाद साजिरा रत्‍नसिंहासनि हो ॥
ओवाळू विघ्नहरा देईल भुक्ति मुक्ति चुकतील येरझारा ॥
गोसावी दास तुझा ॥
मोरया गोसावी दास तुझा ॥
ओवाळू विघ्नहरा जयदेवा मोरेश्वरा ॥
जय मंगलमूर्तीआरती चरण-कमळा ॥ ओवाळूं प्राणज्योति जयदेवा मोरेश्‍वरा ॥८॥

मराठी english