मोरेश्वरा तुज़ भेटवया लागुनी ।।
भक्त येती लोटांगणी ।।
फिटली डोळ्याची पारणी ।।
विघ्नहार देखिलीया ।। १ ।।
माझे मानस गुंतले ।।
चरणी तुझ्या लय पावले ।। ध्रु. ।।
योगिया मानस मनरंजना ।।
तुज स्मरले गजानना ।।
पावें मूषकवाहना ।।
कृपाळू बा मोरेश्वरा ।।
मा. च. ।। २ ।।
माझे अंतरिचे निज सुख ।।
मज भेटवा गजमुख ।।
क्षेम देउनिया सन्मुख ।।
त्रिविध ताप हरले ।।
मा. च. ।। ३ ।।
पैल कऱ्हेतिरी उभा राहे ।।
निजभक्ताची वाट पाहे ।।
वरद उभारूनि बाहे ।।
अभय वरद देत आहे ।।
मा . च. ।। ४ ।।
मोरया गोसावी योगी बोलती ।।
सत्य साक्ष गणपती ।।
भेटी देउनी पुढती पुढती ।।
शरणांगता नुपेक्षिसी ।।
माझें मानस गुंतले ।।
चरणी तुझ्या लय पावले ।। ५ ।।
एक चित्त करुनि मना ।।
नित्य ध्यायी गजानना ।।
म्हणा नाम मोरयाचे ।।
सकळ कारण जन्माचे ।। ध्रु॥
जे जे इच्छिसील मनी ।।
ते ते तुज देईल तत्क्षणी ।।
म्हणा नाम मोरयाचे ।। १ ।।
भुक्तिमुक्तीचे आरत ।।
ध्यारे मोरया दैवत ।।
म्हणा नाम मोरयाचे ।। २ ।।
आणिक कष्ट नको करू ।।
नित्य ध्यारे विघ्नहरू ।।
म्हणा नाम मोरयाचे ।। ३ ।।
येवढा महिमा ज्याचे पायी ।।
तो देव आम्हा जवळी आहे ।।
म्हणा नाम मोरयाचे ।। ४ ।।
मोरया गोसावी विनटला ।।
तेणे उपदेश सांगितला ।।
म्हणा नाम मोरयाचे ।।
सकळ कारण जन्माचे ।। ५ ।।
पूजा अवसर झाला ।।
विघ्नराज संतोषला ।।
तुम्ही चलावे चलावे ।।
सुखे शेज-मंदिरासी ।।
ध्रु० ।।
मंचक घातला सुंदर ।।
वरि पासोडा पितांबर ।।
तु० च० ।। २ ।।
वरि सुमनाचे अरूवार ।।
वरि पहुडले विघ्नहार ।।
तु० च० ।। ३ ।।
सिध्दी बुध्दि दोही हाती ।।
विंझणवारे जाणविती ।।
तु० च० ।। ४ ।।
मोरया गोसावी दातार ।।
चिंतामणी दिधला वर ।।
तुम्ही चलावे चलावे ।।
सुखे शेज मंदिरासी ।। ५ ।।
पावे पावे एक वेळां ।।
तुज विनवितो दयाळा ।।
वाट पाहातो तुझी डोळा ।।
भेटि देई तू मजला ।।
ध्रु० ।।
ध्यान लागले लागले ।।
मन वेधले वेधले ।। १ ।।
तुझिया नामाचा मज भरवसा ।।
कधी तुज देखेन विघ्नेशा ।।
देह झाला उतावळा ।।
चरणी तुझ्या विनटला ।।
ध्यान लागले लागले ।। २ ।।
तू विघ्नांचा नायकू ।।
होशिल विघ्नांचा छेदकू ।।
देव नेणें मी आणिकु ।।
दीना कोण सोडविता ।।
ध्यान ला. ।। ३ ।।
तू त्रेलोक्यदाता चिंतामणीं ।।
दुजा नेणो त्रिभुवनी ।।
विनवी दास चिंतामणी ।।
तुझ्या वेधलो चरणी ।।
ध्यान लागले लागले ।।
मन वेधले वेधले ।। ४ ।।
किती करिसी मना अटाअटी ।।
व्यर्थ भोगिसी दुर्घट ।। १ ।।
व्यर्थ कां रे भ्रमलासी ।।
भजे मोरयापायांसी ।।
ध्रु. ।।
तूं म्हणशिल पुत्र कलत्र माझें ।।
हेचि नोव्हेती रे तुझें ।। २ ।।
ऐसें जाणतां तूं होसी मूर्ख ।।
दृढ धरी तूं विवेक ।। ३ ।।
गेले कल्प आयुष्याचे ।।
(पाय) चरण धरी मोरयाचे ।। ४ ।।
न धरी द्रव्याची वासना ।।
सांडी मायेचें पडळ ।। ५ ।।
जिहीं सांचिलें द्रव्य अपार ।।
त्यासीं पडली वेरझार ।। ६ ।।
मना सांडी सांडी विषयाची गोडी ।।
आयुष्य जाय घडोघडी ।। ७ ।।
वेंचिल्या द्रव्याच्या कोटी ।।
आयुष्य न ये क्षणभरी ।। ८ ।।
ऐसें आयुष्य आहे अमौलिक ।।
व्यर्थ जाऊं न दे पळ एक ।। ९ ।।
बहुत संसारी आहेत कष्ट ।।
चरणीं ठेवी मज निकट ।। १० ।।
विनवी दास चिंतामणी ।।
पुरली संसाराची झणी ।।
व्यर्थ कां रे भ्रमलासी ।।
भजे मोरयापायासीं ।। ११ ।।
आजि एक धन्य दिवस झाला हो माये ।।
गजाननरूप दृष्टी भासत आहे ।।१।।
अहो न गमे नगमे माझ्या मोरयाविण ।।
अहो गजानन मायबाप आम्हा जोडला ।।
मोरया गोसावी योगी चरणीं विनटला ।।
अहो न गमे न गमे मझ्या मोरयाविण ।।२।।
आजि आनंद आनंद ॥
मज भेटला एकदंत ॥
ध्रु ॥
धन्य दिवस सोनियाचा ॥
पाहु देव हा देवांचा ॥
आजि ॥ १ ॥
आनंद झालासे मही ॥
नाम जपा सकळही ॥
मोरया मोरया घोष करितां नासती क्लेश ॥
आज ॥ २ ॥
जन्मफेरे चुकावया ॥
नाम जपा रे मोरया ॥
भवसिंधु तरावया ॥
व्दारें जाऊं करावया ॥
आज ॥ ३ ॥
महायात्रेचा आनंद ॥
मोरेश्वरीं ब्रह्मानंद ॥
टाळ घोषाच्या गजरें ॥
रंगी नाचूं बहु आदरें ॥
आज ॥ ४ ॥
चिंतामणी मायबापे ॥
दाखविलें आपुले कृपें ॥
प्रतिमासीं दर्शन ॥
चुकवी जन्म मरण ॥
आज आनंद आनंद ॥
मज भेटला ॥ ५ ॥
पूजा प्रांत आरंभिला ॥
विघ्नराज संतोषला ॥१॥
तुम्ही चलावे चलावे ॥ सिद्धि बुद्धि मंदिरासी ॥ ध्रु०॥
उद ऊदउनिया मंदिर ॥
लिहिले चित्रे हे सुंदर ॥ तु. च.॥२॥
रत्नजडित मंचकावरी ॥
शोभे भूपती सुंदरी ॥ तु. च. ॥३॥
वरी पासोडा क्षीरोदक ॥
शोभे अनुवार अनेक ॥ तु. च.॥४॥
लवुनिया रत्नदीप्ती ॥
सेवेलागी उभ्या शक्ती॥ तु. च.॥५॥
मुक्ताफळाचा चांदवा॥
वरी बांधिलासे बरवा ॥ तु. च. ॥ ६ ॥
सुगंध द्रव्यें सिध्दी हाती ॥
चरणा संवाहन लागे बुध्दी ॥ तु. च.॥ ७ ॥
सुगंध द्रव्य आणुनी ॥
तुज समर्पाया लगुनी ॥ तु. च. ॥८॥
पायघडीला लागी शेले ॥
त्यासी कस्तुरी परिमळ तु. च. ॥ ९ ॥
करुणा वचनी विनविले ॥
महाराज संतोषले. ॥ तु. च. ॥ १० ॥
येउनि मंदिरी पावले ॥
भक्त आज्ञा हे लाधले ॥ तु. च. ॥ ११ ॥
महाराज मंचकावरी ॥
बैसुनि सुखे निद्रा करी ॥
तुम्ही पहुडावें पहुडावें ॥
सुखें सुमन-शेजेवरी ॥ १२ ॥
सिध्दि बुध्दि चरण चुरी ॥
दिनासी तांबुल दिधला करी ॥
तुम्ही पहुडावें पहुडावें ॥
सुखें सुमन शेजेवरी ॥ १३ ॥
घेउन पदुका शिरी ॥
उभा नारायण द्वारी ॥
तुम्ही पहुडावें पहुडावें ॥
सुखें सुमन शेजेवरी ॥१४॥