पदे खंडोबाचे पद

दिव्य मूर्ति महिपती ये ये हा देखिलें दृष्टी ॥
सुवर्णवर्ण शोभायमान हळदीच्या गात्री ॥१॥

जय जय मल्हारी ये ये हा मार्तंड भैरवा ॥
ब्रह्मादिक उभे सनकादिक पुढे करताती सेवा ॥ध्रु०॥

शामकर्ण अश्‍वारूढ ये ये हा होऊनी निजमंत्री ॥
डावे हाती भंडाराचे घेऊनी सत्पात्री ॥२॥

म्हाळसा पृष्ठी घेऊनी ये ये हा हा नवरा शोभे ॥
भंडार उधळती येळकोट उभे ॥३॥

शिरी बिल्व पत्रे माळा ये ये हा पुष्पाची प्रभा ॥
बाशिंगाला शोभा आली माळांच्या गर्भा ॥४॥

अनेक दैत्य वधुनी घाली ये ये हा पायी तोडरु ॥
पीत वस्त्रावरी माळा दिसे अलंकारु ॥५॥

धावा करिता धांव घेसी ये ये हा भक्त सुखकारु ॥
जारण मारण स्तंभन याचा करिसी संहारू ॥६॥

खड्‌ग उजवे हाती ज्याच्या ये ये हा तीक्ष्ण लखलखीत ॥
श्‍वाने घेउनी समागमे चाले दुडदुडीत ॥७॥

वाघ्या मुरळ्या उभया पुढे ये ये हा स्तवीत समस्त ॥
कामार्थाचे मनोरथ स्वामी पुरवितो ॥८॥

कुलस्वामी माझा होऊनी ये ये हा कुटुंब रक्षीसी ॥
जेजुर गडावरी राहुनी प्रताप मिरवीसी ॥९॥

निदान समयी तुजला स्तविता ये ये हा आरिष्ट वारीसी ॥
आरती हाती घेऊनी विघ्नेश्‍वरे स्तविलासी ॥१०॥

जयजय मल्हारी ये ये हा मर्तंड भैरवा ॥
ब्रह्मादिक उभे सनकादिक पुढे करिताती सेवा ॥११॥

divider-img
मराठी english