पदे पद १०

प्रथम नमूं देव लंबोदरू ॥
जो ऋध्दिसिध्दीचा दातारू ॥
वेद श्रुति शास्त्रासि जो आधारू ॥
तो (महाराज) गणराज नमियेला ॥१॥

रंगी उभी सारजा घन ॥
पुस्तक वीणा करिं घेउन ॥
सानु सानु ध्वनी उमटति जाण ॥
गंधर्व गायन करिताती ॥२॥

तया माजी उभे नारद तुंबर ॥
मृदंग वाजती धिमि धिमि कार ॥
टाळांचा आहे महागजर ॥
रंगी मोरेश्‍वर (क्रिडताती) खेळताती ॥३॥

गणगायक नृत्य करीत ॥
धिमिधिमि भूमि दणाणीत ॥
गिरि गिरि गिरि भवरे देत ॥
थाक तोडि (तक तक) ताल छंद ॥४॥

ऐसे तांडव नृत्य मांडिले ॥
विमानी देव तटस्थ राहिले ॥
मोरया गोसावी योगी बोलिले ॥
रंगि भेटले गणराज (महाराज) ॥५॥

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४