व्यर्थ प्रपंचीं गुतलों बहु (देवा) विषयानें वेष्टिलों ॥
(तुझिया) भजना अंतरलों मोरेश्वरा ॥१॥
बहु फार माया मज लागली या देहा ॥
(महाराजा) एकदा दीनराया मज कृपा करी ॥२॥
प्रपंच ही माया येथें देवा बांधलों दृढची ॥
(भजन) तुझें गा मजसी हो न घडेच ॥३॥
वेचिलें आयुष्य येथें न घडेचि साधन ॥
(माझें) चुकवी जन्ममरण गणाधीशा ॥४॥
तुझिया नामाची मज लागलीसे गोडी ॥
(भव) बंधन तूं तोडी हो (महाराजा) गणराजा ॥५॥
आहेसी कऱ्हेतीरीं होसी (देवा) भक्ता सहकारी ॥
(ध्यान) तुझें म्या अंतरी हो धरिलेसे ॥६॥
अहो कृपेचा सागरु होसी (देवा) भक्तांचा दातारु ॥
(महाराजा) एकदां पैलपार हो उतरी मज ॥७॥
अहो मोरया गोसावी मज जोडिला दातारू ॥
(महाराजा) तेणें मज वरू हो दिधलासे ॥८॥
अहो तूचि तूं एकचि प्रति देवा तुझ्या हो चरणीं ॥
(महाराज) आवडी नामाची मज लागलीसे ॥९॥
कृपा तूं करुनि मज लावि तू चरणीं ॥
(महाराजा) दास चिंतामणी हेचि मागतसे ॥१०॥
अहो येई तूं मोरया चरण (पाय) दाखवी नयनी (देह) कुरवंडी करुनि तुज ओवाळीन ॥११॥
© 2024 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper