पदे पद १४

खेळ्या

आतांचि बापा सावधान हिई लक्ष लावी गजानानीं रे ॥
कां रे तूं प्राण्या विषयीं गुंतलासी ॥
शरण जाई विघ्नेशीं रे ॥
अजून कं रे व्यर्थचि नाडिसी ॥
सोडवण करी देहासी रे ॥
आपुले ठायीं मीतूपण आणसी ॥
मग तूं दीनरूप होसी रे खेळ्या ॥१॥

कासया घेसी हातीं जपमाळा ॥
(बाप्पा) देह शुध्द नाहीं झाला रे ॥
वस्त्रें टाकूनिं वेष बदलिला ॥
काय चाड तुजला रे ॥
बाह्य दाखवूनी आपलें जना ॥
अंतर शुध्द नाहीं केलेरे ॥
व्यर्थचिदाखवुनी जन भुलविले ॥
आपुले हित नाही केले रें खेळ्या ॥२॥

कां रे तुज अज्ञान पडले ॥
हित देख आपुलें रे ॥
पुत्र कलत्र धन संपत्ति ।
तुझी तुला नव्हती रे ॥
असत्य वदुनी पापे भरसी ॥
बांधूनी नेती यम पाशीं रे ॥
म्हणोनी कांही ठेवा ठेवी करी ॥
भजे (महाराज) गणराज पायीं रे खेळ्या ॥३॥

देहाचा भरंवसा न धरी कांहीं ॥
नलिनीवर जळ पाही रे ॥
तैसें जीवित्व आहेच प्राण्या ॥
म्हणोनी सावधान होई रे ॥
आयुष्य भरवशाने नाडिलो बहुत त्याचेच काहि नव्ह्ते रे ॥
तयास झाल्या गर्भवास यातना ॥
दृढ भजे एकदंता रे खेळ्या ॥४॥

नवच मास कष्ट भोगुनि मग आले बाळपण रे ॥
दोन चार वर्षे तिही गेली ॥
मग आले प्रौढपण रें ।
आपापणा तो नाठवी तरुण ॥
वासना धरि विषयाची रे ॥
तरुणपण गेले वृध्दपण आले ॥
मग तुज आहे कोण रें खेळ्या ॥५॥

आयुष्य त्वां रे व्यर्थचि दवडिले ॥
कोण सोडवील तुजला रे ॥
येऊनि काळ घालतो फासा ॥
मग होशील बापुडा रे ॥
गर्भवासाची नसेल उरी ॥
तरी भजे मोरेश्‍वरी रे ॥
गजानना विनवी दास चिंतामणी ॥
लक्ष लावी चरणी रे खेळ्या ॥६॥

टीप – दुसऱ्या कडव्यास दुसऱ्यांदा म्हणवयाचे ’बाप्पा’ हे पालुपद आहे.

divider-img
मराठी english