माझ्या स्वामीचे भोगविलास रे ॥
चला जाऊ पाहू त्या मोरयास रे ॥
चारी दिवस चरणीं करुं वास रे ॥
दर्शन झालिया पातका होईल नाश रे माझ्या स्वामीचे ॥१॥
रत्नजडित मुकुट शोभिवंत रे ॥
स्वामी माझा बैसला देउळांत रे ॥
मोरया गोसावी पूजा करीतो रे ॥
त्यांचे हृदयी नांदतो सतत रे ॥ माझ्या स्वामीचे ॥२॥
एके नारी ती पूजा घेऊनी हाती रे ॥
एके नारी आणिल्या पुष्प याती रे ॥
चंपक बकुले मोगरे मालती रे ॥
महाराजांची पूजा बांधिती रे ॥ माझ्या स्वामीचे ॥३॥
बावन चंदनाची शोभिवंत उटी रे ॥
नवरत्नांचा हार शोभे कंठी रे ॥
मृगनाभीचा टिळकू लल्लाटी रे ॥
गोरा सेंदूर झळकतो भ्रूकुटीं रे ॥ माझ्या स्वामीचे ॥४॥
जाई जुई आबया नागचाफे रे ॥
परिजातक कमळें शोभती घोप रे ॥
भक्त भ्रमर होउनी जाताती झोपी रे ॥
सदा आनंद मोरयाचे कृपे रें ॥ माझ्या स्वामीचे ॥५॥
भक्तजन द्वारें करावया जाती रे ॥
स्वामी माझा उभा तो देउळांत रे ॥
अमृतदृष्टी करुनी न्याहाळितो समस्त रे ॥
त्याचे कृपेनें भाग शीण जातो रे माझ्या स्वामीचे ॥६॥
भक्त भद्र त्यांची द्वारें करिती रे ॥
मोरया गोसावी दिंडी घेउन हाती रे ॥
भाग्यवंत तेथे हरीकीर्तन गाती रे ॥
सकळ जन तेथें लोटांगणी येती रे ॥ माझ्या स्वामीचे ॥७॥
तिन्ही द्वारें करुनि मुक्ताईस जाती रे ॥
मुक्ताबाई वंदोनिया महाद्वारा येती रे ॥
पंचतत्वांच्या आरत्या ओवाळिती रे ॥
त्याची तत्काळ प्रसन्न गणपती रे ॥ माझ्या स्वामीचे ॥८॥
ऐसा आनंद होतसे मोरेश्वरी रे ॥
मोरया गोसाव्यांचा खेळत असे घरी रे ॥
भक्तजनासी प्रसाद देतो झणी रे ॥
निजभक्ता देई परिपूर्ण परी रे ॥ माझ्या स्वामीचे ॥ ९॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper