कां बा रुसलासी कां बा न बोलसी ॥
निष्ठुर झालासी तूं कां बा मजसी ॥
तूं बा न बोलसी आतां काय करू ॥
बहुत श्रमलों कोणीकडे जाऊ ॥१॥
बहुत अपराध किती काय सांगू ॥
संख्या नाही बहुत अन्याया ॥
जरी धेनू टाकी वत्सलासी ॥
तेणें आस करावी कवणाची ॥२॥
ऐसी उपमा तुज काय सांगू किती ॥
व्यापक आहेसी तूं बा मंगलमूर्ती ॥
दुष्ट भोग आहेत प्रपंची ॥
सोडवी आतां मज चुकवी यातायाती ॥३॥
किती भोग भोगू मी येरझारा ॥
कृपा (दया) करी तू माझी बा लवकरी ॥
आता भोग हे किती म्या भोगावे ॥
विनंती करितो तुज ऐकभावे ॥४॥
मन (चित्त) वेधलें एका धरदारीं ॥
मोहापाश तोडावा लवकरी ॥
पुत्र कलत्र धन हें नलगेची ॥
जोडी द्यावी आपुल्या (चरणांची) पायांची ॥५॥
ऐसी करुणा तुज भाकितों दयाळा ॥
आस पुरवी तूं माझी एक वेळा ॥
आस तुझी बा लागली बहुत ॥
अंगीकार त्वां केला पूर्वीच ॥६॥
बहुत अन्याय क्षमा करी मज ।
कोप न धरी तूं विनवितो तुज ॥
तू जरी कोपलासी जावे कवणापाशी ॥
मायबाप सखा (स्वामी) माझा होसी ॥७॥
मोरया गोसावी जोडले (आम्हासी) भक्तांसी ॥
ते तूं एकरूप भासले मनासी ॥
विनवी दास म्हणे चिंतामणी तनुमन वेधले तुझ्या बा चरणीं ॥९॥
© 2024 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper