पदे पद २३

संसारा घालुनि देवा मज कां रे कोपलासी ।।
काय अन्याय म्यां केले ।।
मज कां तूं विसरलासी (उबगलासी) ।।
देह (प्राण) गेला माझा व्यर्थ ।।
तूं कैसा दीननाथ ।।
झणि न लावी तूं उशीरऽ ।।
उतरी तूं पैलपार ||१||

धावे धावे बा मोरया ।।
जाऊं कोणा बोभावया ।।
ऱ्हास करी या कर्माचाऽ ।।
नेणें मी आणिक दुजा ।। ध्रु ।।

आता कांही हें मज नलगे ।।
पुरले देहसुख ।।
क्रीडा केली या प्रपंचीऽ ।।
तेणें भय (दुःख) संसाराचे ।।
पुढती न ये मी येणें पंथा ||
भवदुःखा तोडी व्यथा ।।
कोणा जाऊं मी शरणऽ ।।
नेणें मी तुजवांचून ||२||

कृपासिंधू तूं म्हणविसी ॥
मज दीना उबगलासी ॥
कोठे जावें म्यां कृपाळाऽ ।।
विनवितों तुज दयाळा (कृपाळा) ।।
मन माझे व्याकुळ झाले ।।
दाखवी मज पाउलें ।।
मनोरथ माझे पुरवीऽ ।।
म्हणे दास चिंतामणी ।।
धावे धावे बा मो० ||३||

divider-img
मराठी english