पदे पद २७

तुजविण काय करू देवराया ॥
येई माझ्या विसाव्या ॥

झणी तू उदास न धरी ॥
येई येई लवकरी ॥

तुजविण देह माझा२ हळहळी ॥
झालो बहुत उदास ॥

कैसे म्या कंठावे देवराया ॥
येई माझ्या विसाव्या ॥

येई माझ्या दयाळा ॥
येई माझ्या कृपाळा ॥१॥

अहो जय जय जय गणराज दातारा ॥
ध्रु०॥

अहो यातने गांजलो गर्भवासी ॥
म्हणुनि आलो शरण ॥

नुपेक्षी गणराज दयाळा ॥
आणिक न करी पांगिळा ॥

अभिमान तुज आहे भक्तांचा ॥
ब्रीद बांधिले (बांधुनि) साचा ॥

तुजविण जाऊ कोणा शरण ॥
आणिक दैवत नेणे ॥
अहो जय० ॥२॥

अहो प्रपंच माया ही न सोडी ॥
तेथे लुब्धलो बहुत ॥

पुत्र दारा धनादिक देखोनि ॥
अंती नोहे ती कोणी ॥

जोवरी आहे रे संपत्ती ॥
तोंवरी अवघेचि होती ॥

अंतीं कोणी नाही सोडविता ॥
मग होशिल दुश्‍चित्ता ॥
अहो जय० ॥३॥

अहो सोय नका धरू मायेची ॥
गुंतू नका प्रपंची ॥

इच्याने संगे हें नाडलो ॥
जन देखता भुललो ॥

चरण (पाय) धरा या मोरयाचे ॥
त्रास हरतील कर्माचे ॥

निज पद देउनि स्थापिले ॥
आम्हा चरणी (पायीं) ठेविलें ॥
अहो जय ० ॥४ ॥

अहो म्हणुनिया आवडि बहु जीवा ॥
तुझी लागली देवा ॥

मायेपासुनी तूं सोडवी ॥
व्यर्थ नाडलो देवा ॥

आयुष्य गेलें रे देखतां ॥
मज नाहीं भरंवसा ॥

विनवी चिंतामणी गोसावी ॥
भक्ति आपली दयावी ।
सेवा आपुली घ्यावी ॥
अहो जय जय जय गणराज दातारा ॥५॥

येई माझ्या विसाव्या ॥
येई माझ्या कृपाळा ॥
येई माझ्या दयाळा ॥

अहो तुजविण गांजिलो गर्भवासी ॥
कोणी नाही सोडविता ॥
अहो जय जय जय गणराज दातारा ॥६ ॥

divider-img
मराठी english