पदे पद २

तिन्ही अक्षरांचे नाम तुम्ही म्हाणा रे वाचे म्हणा रे वाचे ॥
चुकतील भवबंधने दोष जाती जन्माचे ॥
जय जय मोरया ॥ माझ्या मोरया हो ॥
रंगा यावे हो माझ्या मोरया हो ॥
वाट पाहतो रे तुझी मोरया हो ॥
भेटी द्यावी हो माझ्या मोरया हो ॥
कधीं मज भेटसी रे बाप्पा मोरया हो ।
धावे धावण्या रे माझ्या मोरया हो ॥१॥

जय जय मोरया हो ॥ माझ्या मोरया हो ॥
ध्रु. ॥

अहो विघ्नेशाचें नाम तुम्ही करावा घोष करावा घोष ॥
नासती पातके दोष जाती भवक्लेश ॥
ज. मो. ॥२॥

अहो गजानन गजानन म्हणा रे मना म्हणा रे मना ॥
चुकतील भवबंधने तुज नाही यातना ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥३॥

अहो मयूरक्षेत्री कऱ्हे तिरीं रहिवास केला देवा रहिवास केला ॥
ध्यारे भक्त (दास) हो तुम्ही त्याचा सोहळा ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥४॥

जन्मोजन्मी दास तुझा आहे गणराजा दास आहे महाराजा ॥
आणिक दैवत आम्हा नलगे या काजा ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥५॥

अहो सेंदूर डवडविले रूप देखिलें डोळां रूप पाहिले डोळां ॥
कोटिसूर्य तेथे त्यांच्या लोपल्या कळा ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥६॥

अहो धावे धावे मोरया देई तू भेटी ॥
मजला देई तू भेटी ॥
अखंड नाम तुझे म्यां धरिलेसे कंठी ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥७॥

अहो मृत्युलोकीं कऱ्हे तीरीं रहिवास केला देवा रहिवास केला ॥
निजभक्ता (निजदासा) द्यावया मुक्तीचा सोहळा ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥८॥

अहो मुषकावरी आरूढ होऊनि येई लवकरी देवा येई लवकरी ॥
बहुत देवा शिणलो ये मी संसारीं ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥९॥

अहो चतुर्भुजमंडित रूप देखिले (पाहिले) नयनी ॥
हे मन वेधले तुझ्या बा चरणाजवळी१ ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१०॥

अहो परशु लमळ अंकुश घेऊनी (माझी) आली माउली ॥
हें मन वेधले तुझ्या बा चरणाजवळी ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥११॥

अहो गणनाथ म्हणा रे सदा म्हणा रे सदा ॥
भय नाही तुम्हासी यमाचे कदा ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१२॥

अहो मोरया गोसावी (देवा) तुज करितों विनंती ॥
तारी भक्ता (दासा) वेगें तू येई गणपती ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१३॥

अहो मोरया मोरया हो (देवा) जे भक्त ध्याती ॥
तयांच्या कामना पूर्ण शीघ्रचि होती ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१४॥

अहो जन्ममरण गर्भवास चुकविता नाहीं ॥
दुजा चुकविता नाहीं ॥
एक आहे हा (तो) त्राता गणराज पाही ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१५॥

अहो मेरया गोसावी यांचे (देवा) देहीं पै वासू ॥
द्वैत नाही तयासि हृदयी गणेश ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१६॥

अहो मयूरक्षेत्री कऱ्हे तीरी (देवा) रहिवासू केला ॥
भक्तिभाव देखोनिया चिंचवडी आला ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१७॥

अहो जपतप अनुष्ठान (देवा) नलगे साधन ॥
देई देवा मज तू हृदयी चरण ॥
ज. मो. ॥ मा. मो. ॥१८॥

दुष्ट भोग झाले (मोरया) मज न कळे गती ॥
देवा मज न कळे गती ॥
चिंतामणी दास तुझा करितो विंनती ॥
जय मो. ॥ मा. मो. ॥१९॥

divider-img
मराठी english