पदे पद ३७

सासुर

अहो सासुर हो माझें हो ऐका हो साजणी (देवा) ।
त्याचि (मोरया) हेचि परी मी सांगतसे ॥१॥

अहो निर्दय दादुला हो काम हाचि दीर ।
क्रोध हचि भाव हो आहे मज ॥२॥

अहो आशा तृष्णा दोन्ही जावा ह्या अनिर्वाच्या ।
अहो (मोरया) यांचा हाचि संग हो नको मज ॥३॥

अहो लोभ हा सासुरा हो निंदा हेचि सासू ।
यांचे हेचि संगे मी त्रासलीसे ॥४॥

अहो म्हणोनियां छंद हो माहेरी लागला ।
अहो जाईन मोरेश्वरा मी आजि तेथे ॥५॥

अहो तेणे संग तुटती (हो) गणराज देखुनी ।
अहो (मोरया) सुख तेचि पावें हो जन्मोजन्मीं ॥६॥

अहो तेथें असतील हो सिद्धी बुद्धि माता ।
माझा भेटेल हा पिता हो गणराज ॥७॥

अहो तेणें सुख वाटे देवा मज हें बहुत (देवा) मज हें बहुत ।
माझ्या प्रपंचाचें दुःख हो जाय तेव्हां ॥८॥

अहो ऐसे हे सासुर हो गाई (देवा) चिंतामणी ।
एक (मजला) मोरया वाचोनी हो नाहीं कोणी ॥९॥

(चिंचवडच्या चौथ्या द्वारयात्रेतून परतताना ३६ व ३७ या दोन पदांनी सुरवात करावी.)

divider-img