दुर्घट संसारी हो (देवा) कष्टलों बहुभारी ।
एकदां भेटी तूं लवकरी हो देई मज ॥ १॥
प्रपंचाची माया हो (मज) लाविलीस देवा ।
भजन तुझी मज सेवा हो न घडेची ॥ २॥
कोणाचा प्रपंच हा (देवा) कां मज लाविला ।
चरण (पाय) तुजे मज अंतरले रे मोरेश्वरा (मायबापा) ॥ ३॥
मनुष्य देही बहू हो भोगितो बहु कष्ट ।
पाप आहे रे उत्कट मी काय करूं (बोलूं) ॥ ४॥
आणिक एक विनंती हो (देवा) परिसे तूं गणपती ।
आपला छंद (वेध) मंगलमूर्ती हो लावि मज ॥ ५॥
पापांत ठेविले हो (देवा) पाप किती भोगू ।
कृपा (दया) मज करी तूं सनाथा रे मायबापा ॥ ६॥
माझिये मानसी हो लागली बहु आशा ।
भेटी देई तूं विघ्नेशा हो दीनालागीं (दासालागीं) ॥ ७॥
दिधली त्वां मज आशा हो देवा न करी तूं निराशा ।
आहे तुझा मज भरवसा रे (मायबाप) मोरेश्वरा ॥ ८॥
अजुन किती भोग हो भोगू मी दातारा ।
कृपा (दया) तुज उपजेना उदारा मी काय करूं (बोलू) ॥ ९॥
येई तू लवकरी हो देवा शिणलों मी बहुभारी ।
अहो आरूढ मुषकावरीं हो दीनालागी (दासालागी) ॥ १०॥
करूणा तुज भाकितों हो (देवा) अखंड ध्यानी मनीं ।
धरिले दृढ मनीं हो चरण (पाय) तुझे ॥ ११॥
ऐसी करूणेचि वचनें (देवा) निवेदितों चरणीं ।
दास चिंतामणी हो विनवितों ॥ १२॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper