कष्टतोसि भारी हो मज दीना कारणे ।
श्रम थोर झाला तुज भारी मी काय करूं (बोलूं) ॥ १॥
बहु अन्यायी मी फार हो किती वाहसिल माझा भार ।
माय माझी कृपाळू (दयाळू) तूं फार हो मज लागी ॥ २॥
धेनु जाई चरायासी वेगी येई वत्सापासी ।
तैसा स्नेहाळू तूं होसी रे (कृपावंता) ॥ ३॥
माझें नाहीं पुण्य फार हो ।
किती वाहसलि माझा भार ।
नाहीं मज घडली सेवा फार हो तुझी देवा ॥ ४॥
ऐसा अन्यायी मी आहें हो (भक्ति) न कळे मज कांहीं ।
कर्मे घडलीं नाहीं फार हो (मायबापा) मोरेश्वरा ॥ ५॥
नवविधा ही भक्ति हो नाहीं मज ठाऊकी ।
पूर्व पुण्य नाहीं माझें रे कृपावंता (दयावंता) ॥ ६॥
अजून बापा मज हो नव्हतें रे कळले ।
अहो पतितपावन नाम साच केले ॥ ७॥
दीन वचनी विनवितों हो नाम तुझें मागतों ।
चिंतामणी दास हो विनंति करीं ॥ ८॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper