पदे पद ३

ब्रम्हकमंडलू गंगा ॥ पवित्र पावन जगा ॥
तटी दक्षिणभागा मोरेश्वर ॥
जो पठिजे पुराणी ॥
आदि चिंतामणी तो पाहूं लोचनी धरणीवरी बाप ॥१॥

चला चला हो जाऊं ॥ मोरया पाहू ॥

अहो इच्छिले फळ देईल देव ॥
ध्रु० भाद्रपद शुध्द चतुर्थीसी पोहा मिळाला यात्रेसी ॥
मोरया धरूनि मानसी गर्जताती ॥
करुनि भीमकुंडी स्नान ॥
निर्मळ होऊन मन ॥
देवदर्शना मग येती बाप ॥२॥

प्रथमता गवराई जननी ॥
तेथे वंदुनी आदिस्थानी ॥
मग प्रवेश भुवनी भैरवदेवा ॥
यथाशक्ति सेवा ॥
कुंभजासंभवा ॥
नमन देवराया ॥
तुज केले बाप ॥३॥

मग भीतरी प्रवेशती ॥
मंगल मूर्ति देखती ॥
अहो दंडवत जाती लोटांगणीं ॥
षोडश उपचारें पूजा ॥
करुनि विघ्नराजा ॥
आरंभ द्वाराचा तेथुनियां बाप ॥४॥

पूर्व द्वारासी जातां ॥
तेथें मांजराई माता ॥
अहो तिची पूजा करिता वेळो नलगे ॥
बरवी ते मोहनमाया ॥
पूजा करुनि पाया ॥
सवेंचि देवराया ॥
जवळी येती बाप ॥५॥

दक्षिण द्वारासी जातां ॥
तेथें आसराई माता ॥
अहो तिची पूजा करितां वेळो नलगे ॥
बरवी दीनदक्षा ॥
भक्ति करुन लक्षा ॥
सवेचिं कल्पवृक्षा ॥
जवळी येती बाप ॥६॥

पश्चिम द्वारासी जातां ॥
तेथें वोझराई माता ॥
अहो तेथे पंडुसुता श्रम हरला ॥
बरवी ते गिरिजा ॥
चरण करुनि पूजा ॥
सवेंचि विघ्नराजा ॥
जवळी येती बाप ॥७॥

पावतां उत्तरद्वार ॥
तेथे वेदमाता मनोहर ॥
अहो मुक्ताईची थोर करिती पूजा ॥
उल्हास होय जीवा ॥
तेथून घेती धांवा ॥
त्या होय विसावा ॥
मोरेश्वरी बाप ॥८॥

ऐसा अस्त न होता गभस्ती ॥
जे चारी द्वारें करिती ॥
अहो तें फळ पावती अभिलाषीचे ॥
मोरया गोसावी म्हणे ॥
मज आली प्रचीती ॥
म्हणुनि तुम्हाप्रति सांगतसे बाप ॥९॥

चला चला हो० ॥

divider-img