स्वप्न देखिले नयनी हो रात्रिच्या पै वेळीं ॥
(महाराजा) विघ्नेश माऊली म्यां देखियेली ॥ १ ॥
बहुत पुण्याची बांधणी परी देखिली नयनी ॥
(महाराजा) आतां यासि मनी हो न विसंबे ॥ २॥
पावे पावें तूं मोरया हो माझिया धांवण्या ॥
(महाराजा) तुजविण देवराया मज कोणी नाही ॥ ३॥
न विसंबे तुज हो देवा आपुलिया काजा ॥
(महाराजा) चरण तुझे ओज मी ध्यातों आहें ॥ ४॥
मयुरपुरीं वास त्वां केला गजानन ॥
(महाराजा) भक्तांच्या कामना तूं पुरविसीं ॥ ५॥
ज्या जैसी वासना हो तैसा तूं रे देसी ॥
(महाराजा) म्हणोनि चरणासी (पायासि) हो भजताती ॥ ६॥
क्षणक्षणा तुज ध्याती अवघा मंगलमूर्ति ॥
(महाराजा) तया देहगति हो नाही कदा ॥ ७ ॥
माझें वेधले हें मन हो लागले तुझें ध्यान ॥
(महाराजा) म्हणोनी शरण तुज आलों आहे ॥ ८॥
येई तूं उदारा हो गणराजा सुंदरा ॥
(महाराजा) ध्यान मोरेश्वरा मज लागलेंसे ॥ ९॥
रूप देखिलें सुंदर हो विघ्नेश मनोहर ॥
(महाराजा) तयासी म्यां वर हो मागितला ॥ १०॥
प्रसन्न ज्या भक्ता तू होसी गणनाथा ॥
(महाराजा) त्यासी जन्मपंथ हो नाही कदा ॥ ११॥
मोरया गोसावी मज निधान लाधले ॥
(महाराजा) त्याचेने कृपेने तुज देखियेले ॥ १२॥
तनुमन लागले हो तुझ्या हो चरणी ॥
(महाराजा) दास चिंतामणी तुज ध्यातों आहे ॥ १३ ॥
© 2024 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper