पदे पद ४८

प्रथमारंभी ध्यातों गजानन देव ।
त्यचेनें कृपेनें ध्यातो विश्वबीज ।
तुज हो ध्याती अंबे त्रैलोकीचे देव ।
तुझा हो रहिवास नकळे कवणा हो माये ।
सकळासि प्रसन्न झाली जगदंबा ।
गणराज म्हणे तूं येई हो अंबे ।
सकळासि भाव तुझा आहे हो निकट ।
भक्तिलागी पाव वेगीं म्हणतसे तुज ।१॥

जय जय जय आनंद सकळ परिवार ।
दैत्य वधून कैसे तारियेले जन ।
भेटी देई सकळा जाई निजस्थाना ।।
प्रथम अवतार तुझा अकळू हो माये ।
ब्रह्यादिक प्रार्थितीसी सदोदित अंबे ।
देवाच्या वचनासी पावलीस वेगीं ।
निराकार देह तुझा येई हो आकरा ।।२॥

आकारा न येसि तरी पाहवीस कोठें ।
प्रतिमेवेगळी तूं न कळसी कोठें ।
अर्चन करुनि माता पावली सकळा ।
रहिवास केला त्वां मार्कंडेय -वचना ।।३॥

अरण्यांत वास तुझा ऋषिवरी कृपा ।
आनंदली जगदंबा वचन बोलती ।
कासया परि तुम्ही आलेती हो ऋषी ।
ऋषी बोलती माते दे आम्हा भक्ति ।।४॥

आणिक नवल थोर झाले हो अंबिके ।
मोरया गोसावी म्हणे प्रार्थिले हो तुज ।
पूर्वीच्या वचने करुनि भेटलीस मज ।
धरिले चरण तुझे मोरेश्वरी आर्त ।।५॥

दीनानाथ कृपा करी दारिद्र्य हो नाशी ।
अकळू जननी तुज वर्णू मी किती ।
वर्णू जो लागलो तुज निराकार गोष्टी ।
वरद – कृपेनें म्या देखिलीस दृष्टि ।।६॥

मज हो ठेविले कैसे न ये काकुलती ।
कष्टाची गति कळली तुजसी ।
मृत्युलोकीं ठेवियेले उपकारालागी ।
देहधारी शरीर होतसे कष्टी ।।७॥

पापाच्या राशी देखतसे दृष्टी ।
आणिक वचन एक ऐक हो माये ।
विषयाचे गुण मज नाहीं कोठें ।
काकुलती येतो अखंड ह्रदयीं ।।८॥

जय जय जगदंबे पुजेलागि यावें ।
सकळ देऊन मज केले हो सरत ।
त्रिकाळ रुप तुझे हृदयसंपुष्टी ।
आरती करीन तुज सकळासारखी ।।९॥

मोरया गोसावी म्हणे मागू तुज काय ।
सकळ परिपूर्ण मज आहे हो जगदंबे ।
नवरात्र करितील नर नारी बाळे ।
त्यांचे हो मनोरथ पुरवी लवकरी ।।१०॥

कष्टलिये शरीर लागलों चरणी ।
मोरया गोसावी म्हणे आहे देहधारी ।
शरिराची गती मज न कळे हो परी ।
प्रपंच तोडी आतां न करी वेरझारा ।।११॥

मुळाविण यावे तरी अधोगती देहा ।
सकळ मिळोनी मज मूळ पाठवावे ।
सकळ परिवार मज न्याहो लवकरी ।
उदंड बोलणे तरी समर्थासी काय ।।१२ ॥

मायेच्या लक्षणे करुनि सांड नाही देहा ।
झडकरि न येसी तरी प्राण गेला वाया ।
करूणेचे शब्द ऐकिले देवे ।
मजचि असतां तुज गांजिल कवण ।।१३॥

अखंड हृदयी आहे निरंतर जवळी ।
प्रतिमासी दर्शन आहे मज जवळी ।
सकळिका जनामध्ये ठेविले तुज बाळा ।
माझिया वचनाचा नको करूं अनुभव ।।१४॥

मजचि कारणे तूं बा टाकिलें सकळिक ।
अवघाचि अभिमान आहे तुझा मज ।
उपकार मूर्ति केली तुजलागीं ।।१५॥

देवाच्या वचने मज सकळ परिपूर्ण ।
नलगे अवसर हा सकळ देवा वंदी ।
भक्तीच्या वचने गायिला गोंधळ ।
पाहु जों लागलों तों एकचि मिळुनि ।
उभयंता मिळुनि लागलों चरणी ।।१६॥

जय जय आ०॥

divider-img
मराठी english