पदे पद ५०

मयूरपुर गांवीं रहिवास धरिला ।
थोर भाग्य याचे जन उध्दरिला ।
तया ठायासी जा रे एक भावे ।
देह अहंकार टाकुनिया धावे ।१॥

येई येई तूं येई तूं येई मोरेश्वरा ।
तुजविण नाही रे भक्ता साहाकारी ।
ध्रु०॥

वाट वत्स जैसी धेनूची पाहाती ।
तैसी आस तुझी लागली गणपती ।
तनुमन धान लावा रे चरणी ।
फुकासाठीं तुम्हा सांपडली झणी ।२॥

सावध होऊनिया जावे तया ठायां ।
मागील वासना टाका तुम्ही माया ।
माया नको धरूं विषय – सुखाची ।
तेणे हित काही नोव्हे तुमचे जाणा ।३॥

अंतकाळी तुज न येती रे कामा ।
शरण जाई एका मोरयाच्या नामा ।
भवबंधन कोण चुकवील ।
देहाअंती तुज कोण सोडवील ।४॥

म्हणोनी धांवा धांवी करा संसाराची ।
जोडी करा एका मोरयानामाची ।
व्यर्थ म्हणशील तूं माझें माझे प्राण्या ।
सर्वही टाकुनिया जाशील अज्ञाना ।५॥

सकळिक राहतील आपुलाले ठायी ।
तेथे तुज कोण सोडवीता आहे ।
म्हणोनी धरा तुम्ही मोरयाची सोय ।
हित काही तुम्ही विचारा रे देहीं ।६॥

विनवी दास म्हणे चिंतामणी ।
गर्भवासी देवा शिणलों मी बहु भारी ।
चरणा (पाया) पासून तूं न करी मज दूरी ।
म्हणोनी चरण तुझे धरिले दृढ भारी ।७॥

येई०

divider-img
मराठी english
उत्सवपत्रिका २०२४