मोरेश्वर स्थळ तुझे आदिस्थानक ।
तेथे भक्त येती तुज शरणागत ।
तुझिया ठायासी येती कर्मदोषी ।
कामना तयांच्या तूं बा पुरविसी ।१॥
नाम घेतां तुम्ही कां रे लाजताती ।
नामासाठी तुम्हा होईल (स्वानंद) वैकुंठप्राप्ती ।
ध्रु.॥
ध्याती देवा तुज मागती अपार ।
कृपा करिसी देवा चुकविसी संसार ।
स्मरण केलिया पापें दग्ध होती ।
जडजीव उद्धरिले तूं बा गणपती ।२॥
ऐसें दैवत मी न देखे दुसरें ।
नाम घेतां तया नलगेची पै येणें ।
तारि तारि भक्ता तू रे गजानना ।
एक वेळ लावी तू आपल्या चरणा ।३॥
नवमास सोशिल्या गर्भीच्या यातना ।
बाळपण गेलेंरे रुदन अज्ञाना ।
तरूणपण बहर विषयाची वासना ।
एक वेळ धावे रें पावे गजानना ।४॥
व्यर्थ सर्पीण माया झोंबली अंतरीं ।
तुजवीण कोण आहे विष बा उतरी ।
इचिया विखारे नाडलों बहुत ।
उतरी देवराया माझे तू त्वरित ।५॥
इचिया लहरी जाळती शरीरी ।
धाव पावे देवा यावे बा लवकरी ।
आतां साहवेना उशीर न लावी ।
दास चिंतामणी तुझी तुज विनवी ।६॥
नाम घेतां॥
© 2024 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper