मोरेश्वर गांव बरवा ठाव ।
तेथे नांदतो मोरया देव ।
तयाच्या ठायां जा रे एक भावें ।
कृपा करिल मनी दुज न धरावे ।१।
चला रे भाईंनो जाऊ त्या ठायां ।
नाचत नाचत पाहूं मोरया ।
ध्रु.।
कऱ्हेच्या पाठारी नांदे इच्छा दानी हो ।
आणिक दैवत मी न देखे लोचनी हो ।
तयाच्या ठायां जा रे लोटांगणी हो ।
झणी वरी पहा तुम्ही आपुले नयनी हो ।२।
कामना टाकून तुम्ही भजा एकदंत हो ।
निष्काम भजा तुम्ही ध्या रे गणपती हो ।
कामनेची आस नका भजा मोरेश्वरी हो ।
निष्काम भजाल तुम्ही जाल मुक्तिद्वारा हो ।३।
कामना इच्छाल तरी होईल एक प्राप्ती हो ।
निष्काम भजाल तुम्हां होईल नाना प्राप्ती हो।
अंती तुम्हा भय नाही देही उत्तम गती हो ।
कृपा करील तो भजा सर्वार्थी हो ।४।
भाद्रपद मास आला उल्हासलों मनी हो ।
वेगि भेटी द्यावी भक्ता त्वरित हो ।
तुजविण भक्त झाले सकळ अनाथ हो ।
येति तुझ्या ठायां होति सनाथ हो ।५।
भाद्रपद मासाचे ठायीं चाललों यात्रेसी हो ।
ध्वजा पताका आनंदे मिरवती हो ।
मोरया मोरया नाम गर्जताती हो ।
धन्य त्यांचे भाग्य देही उत्तम गती हो ।६।
आलों लवलाही देखिलें कऱ्हा तिर हो ।
स्नान करूनी तेथे झालो निर्मळ हो ।
दंडवत चालिलो आम्ही देऊळांत हो ।
देखिलीं पाऊलें झालो सुस्नात हो ।७।
टिपुरि घालितो तुझे महाद्वारी हो ।
आनंदले भक्त कैसे नाचती गजरें हो ।
लडिवाळ तुझे कैसे खेळती रंगणी हो ।
आपण गणराज स्वयें खेळ पहाती हो ।८।
टिपुरी खेळता माझें झालें समाधान हो ।
आपण पहाती स्वयें गजानन हो ।
चिंतामणी दास म्हणे लीन तुझ्या चरणीं हो ।
चरणापासुनी आणिक ठायां न ठेवी हो ।
चला रे भाईंनों जाऊं त्या ठांयां ।
नाचत नाचत पाहूं मोरया ।९।
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper