पदे पद ६१

बाळसंतोष (चिंतामणीमहाराजांचा)

मोरेश्वरा तू मज भेटलासी दाता तत्वता ।
दान देई तू समर्था ।
बाबा बाळ संतोष ॥
करुणा भाकितो एकदंता ।
बाबा बाळ संतोष ॥१॥

दान मागतो तुज मी एक ।
चरणीं (पायीं) ठेवी मज निकट ।
बाबा बाळ संतोष ॥
आणिका अर्थी रे नाही काज ।
बाबा बाळ संतोष ॥२॥

तू म्हणसील देईन धन संपत्ती ।
नलगें मज रे धन प्राप्ती ।
बाबा बाळ संतोष ॥
हृदयी राहे रे गणपती ।
बाबा बाळ० ॥३॥

तुज वाटले दिधले पुत्र कलत्र ।
याचे नलगे रे मज सुख ।
बाबा बाळ संतोष ॥
याच्या संगें रे दु:ख प्राप्त ।
बाबा बाळ संतोष ॥४॥

प्राप्ति गतीच्या ठायी न येती कोणी कामा ।
शरण आलो रे तुझिया नामा ।
बाबा बाळ संतोष ॥
विटलो विषय (विषयाच्या) सुखास ।
बाबा बाळ० ॥५॥

लक्ष चौऱ्यांशी योनी हिंडोनी ।
कष्ट झाले रे माझ्या देही ।
बाबा बाळ संतोष ॥
तेणें दु:ख रे राहे चरणीं ।
बाबा बाळ० ॥६॥

मागणें नाही तुज कांही उत्कट ।
उध्दरावे रे वेगी भक्त ।
बाबा बाळ संतोष ॥
दाना उशीर झाला बहुत ।
बाबा बाळ० ॥७॥

तुझें दान लाधले गा जयासी ।
चुकले गर्भ रे रहिवासासी ।
बाबा बाळ संतोष ॥
त्याच्या झाल्या रे पुण्यराशी ।
बाबा बाळ० ॥८॥

प्राप्ति केली तुझी म्या पूर्वी ।
विनवी चिंतामणी गोसावी ।
बाबा बाळ० ॥
कृपा (दया) स्नेह रे भक्ता पाहे ।
बाबा बाळ० ॥
बाबा बाळ संतोष ॥
बाबा बाळ संतोष ॥
बाबा बाळ संतोष ॥
कृपा (दया) स्नेह रे भक्ता पाहे ।
बाबा बाळ संतोष ॥९॥

divider-img