अहो कामधेनु गाय ।
मोरया हो माय ॥
हुंबरोनी पाहे कैसी आलि ॥ १॥
अहो कोंडा दारवंटा ।
असो द्या वाड्यात ॥
ह्रदयामंदिरात माझे घरी ॥ २॥
अहो सुकृत सामग्री ।
असईल जरी ॥
मिळवण करी इस घाला ॥ ३॥
अहो पंचरसाची चरवी ।
मन (चित्त) धरा हाती ॥
दोहा बरव्या रीती कामधेनु ॥ ४॥
अहो बैसे सावचित्त ।
कांसे घाली हात ॥
नाही तरी लाथ देईल झणी ॥ ५॥
माझ्या भय वाटे मनासी ।
हात घालू कैसी ॥
तिखट शिंगासी बोलूं नये ॥ ६॥
अहो धीर धरी नेटका ।
मनची सांडी शंका ॥
पान्हा येईल१ मुखा ।
पाहे आतां ॥ ७॥
अहो पान्हा जो दाटला ।
झरारु सुटला ॥
तनुमन सोडा वत्स इचे ॥ ८॥
माझ्या बळीयाड मनीचे ।
देह सत्व गुणाचे ॥
अमृत स्तन पितें ।
त्यासी पावे ॥ ९॥
अहो पुरवील ठेवा ।
बरवें आचरण ॥
कामधेनु तया घरी दुभे ॥ १०॥
अहो मिस्किण गाऊली ।
निजभक्ता माऊली ॥
अमृत वोळली आली येथें ॥ ११॥
अहो रोहेमोहे रस ।
कुरवाळुनी हाते ॥
पान्हा जो गणनाथे घातलासे ॥ १२॥
अहो ऐसी कामधेनु ।
आहे चिंचवडी ॥
(अहो मोरेश्वरी) मोरया गोसावी दास तुझा ॥ १३॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper