पदे पद ६५

अहो जोडला मोक्षदाता ॥
भुक्ति मुक्ति यासी मागू ॥

अहो तारील हा जन्मोजन्मी ॥
चरणीं (पायीं) याचे रे राहो ॥

आहे उध्दरिले अनंत कोटी ॥
आम्हा तारी जगजेठी ॥

माझ्या चिंतोबाचा (चिंतामणीचा) धर्म जागो ॥
ध्रु० ॥

अहो चिंचवडी रहिवास नाम मोरया देव ॥
पुरवी तो मनकामना ॥
म्हणुनि चिंतामणी नाम ॥१॥

अहो चिंता माझी हरी देवा ॥
चुकवी जन्मयातना ॥
माझ्या ० ॥२॥

अहो अज्ञान बाळ तुझे देवा ॥
आलों तुझिया ठाया ॥

अहो कृपा करी देवराया ॥
लावी आपुल्या पाया ॥

अहो न सोडी बा चरण (पाय) तुझे ॥
आणिका ठायासीं नव जाये ॥
माझ्या० ॥३॥

अहो बुध्दिहीन पांगूळ मी ॥
आलों तुझिया ठाया ॥

अहो नुपेक्षी तूं देवराया ॥
देई भक्तिसोहळा ॥

अहो मन माझे गुंतलेंसे ॥
कोठें नव जाय देवराया ॥
माझ्या चितो० ॥४॥

अहो मजवरी कृपा करी ॥
सेवा आपुली घेई ॥

अहो चिंतामणी गोसाव्यांनी ॥
कृपा (दया) मजवर केली ॥

अहो कृपे (दये) स्तव जोडी झाली ॥
गेल्या पापाच्या राशी ॥
माझ्या चिंतो० ॥५॥

अहो आणिक एक विनंती ऐक ॥
भक्ता तारी तूं सनाथ ॥

अहो कृपा (दया) मज बहुत करी ॥
विनवी नारायण दीन ॥

अहो चरणापासून न करी दुरी ॥
चरण (पाय) धरिले दृढ भारी ॥
माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥६॥

याचे चरणीं लक्ष लागो ॥
याची सेवा मज घडो ॥
याचे ध्यान हृदयी राहो ॥
माझ्या चिंतोबाचा धर्म जागो ॥

divider-img
मराठी english