पदे पद ७२

मोरेश्वरा विधिजावरा ये ये हा चरण सुकुमारा ।।
दावी नयनी धीरा नेई माहेरा ॥ ध्रु०॥

संचित प्रारब्धासी ये ये हा आलो जन्मासी ।
माझा मी सासुरवासी पडिलो भ्रांतीसी ॥ १ ॥

माझें माझे म्हणतां ये ये हा आयुष्य सत्ता ।
व्यर्थ गेलें आतां मज धांव रे एकदंता ॥२॥

धांव रे पाव रे दीनराया ये ये हा गेलो मी वायां ।
पतितासी उद्धरी या पवन गुणवर्या ||३||

जन्मोजन्मी तुज न सोडी यें ये हा पायी मुकुंडी ।
दिधली बापा न करी सांडी चरण न सोडी ॥४॥

माथा मुकुट रत्नजडित ये ये हा कुंडली तळपत ।
केशर भाळी मृगमद टिळा झगझगीत ॥५॥

प्रसन्न वदन मनोहर ये ये हा शिरी दूर्वांकुर ।।
आयुधे सहित चारी कर दे अभयवर ॥६॥

चंदनचर्चित पुष्पमाळा ये ये हा नवरत्न गळां ।।
यज्ञोपवीत आंगुळ्या नखी चंद्रकळा ॥७॥

लंबोदरा रत्नदोरा ये ये हा कटी पितांबर ।।
सरे जानु जंघा पोटऱ्या वाकी तोडऱ्या ॥८॥

हिरे जडित सिंहासनी ये ये हा पाऊले दोन्ही ।।
दाविनले देवावाणी ते मनुजा धणी ॥९॥

सिद्धिबुद्धि दोही हाती ये ये हा चवऱ्या ढाळिती ।।
पादुका घेउनी उभा हाती बाळ गर्जे किती ॥१०॥

थयथय अप्सरा नाचती ये ये हा गंधर्व गाती ।।
टाळ मृदंग वाजविती देवा ओवाळिती ॥११॥

मोरेश्वरा विधिजावरा ० ॥

divider-img