प्रथम नमू देव गणराजू ॥
देवी गौरीचा आत्मजू ॥
चतुर्भुज परशुध्वजू ॥
तो गणराज वंदू आतां ॥१॥
उपांग श्रुती टाळ मृदंग ॥
सारजा गायन करिती शुध्द ॥
तेणे रंग उडवी नानाविध ॥
गणराज (महाराज) माझा नृत्य करी ॥२॥
साही राग छ्त्तीस भार्या ॥
आलाप करी सारजा माया ॥
धित् धित् धिम किटि नाचे गणराया ॥
रंग पहावया देव आले ॥३॥
ऐसा रंग बरवा वोजा ॥
प्रसन्न होई तूं विघ्नराजा ॥
मोरया गोसावी म्हणे दास तुझा ॥
गणराज (महाराज) माझा नुपेक्षी रे ॥४॥
© 2023 Chinchwad Deosthan Trust. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper